शाह यांच्यासंबंधीच्या टिप्पणीचे प्रकरण
वृत्तसंस्था/ रांची
झारखंड उच्च न्यायालयाने एका खटल्यावरून सुरू असलेल्या सुनावणीत जबाब दाखल करण्यास विलंब केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. चाईबासाच्या एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींकडून भाजपचे तत्कालीन अध्यक्षांच्या विरोधात करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद टिप्पणीशी निगिडत खटल्याची दखल घेतली होती. हा खटला रद्दबातल करण्यासाठी राहुल गांधी यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मागील महिन्यात झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा होता. तसेच चाईबासा न्यायालयात सुरु असलेल्या कार्यवाहीला स्थगिती दिली होती. याप्रकरणी राहुल गांधी यांना जबाब दाखल करण्यास सांगण्यात आले होते. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अधिवेशनात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली होती अशी तक्रार चाईबासा येथील रहिवासी प्रताप कटियार या व्यक्तीकडून करण्यात आली होती. काँग्रेसमध्ये कुठलाच खुनी राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही. काँग्रेसचे सदस्य कुठल्याही खुन्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारू शकत नाही. हे केवळ भाजपमध्येच शक्य असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले होते. या आक्षेपार्ह टिप्पणीच्या विरोधात चाईबासा न्यायालयाने राहुल गांधी यांच्या विरोधात एप्रिल 2022 मध्ये जामिनपात्र वॉरंट जारी केला होता. याची राहुल गांधी यांनी कुठलीच दखल घेतली नव्हती. यानंतर न्यायालयाने फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांच्या विरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. यानंतर राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.









