वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणातील नूह येथे 31 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर सरकार पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसले. तेथील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवला जात होता. मात्र आता नूहमधील बुलडोझरला ब्र्रेक लावण्यात आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बुलडोझरच्या कारवाईची स्वत:हून दखल घेत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने तोडफोडीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. नूह येथील बेकायदा बांधकामांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत होती. मेवातमधील अतिक्रमण हटवण्याची आणि बांधकामे पाडण्याची दखल घेत उच्च न्यायालयाने हरियाणा सरकारकडून अहवाल मागवला. नूह जिह्यात सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईच्या विरोधात न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली होती. त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत पाडकामाला स्थगिती देण्यात आली आहे. गेल्या चार-पाच दिवसात अवैधपणे बांधण्यात आलेली घरे, झोपड्या आणि हॉटेल्सवर पाडकाम कारवाई करण्यात आली होती. तसेच हिंसाचारात सहभागी झालेल्या संशयित तरुणांचे वास्तव्य असलेल्या भागातही अनेक झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या.









