मुंबई :
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात आत्तापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तत्काळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.
दिल्ली बॉम्बस्फोटाची घटना घडताच तत्काळ मुंबई पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी हायअलर्ट घोषित केला. सीएसएमटी रेल्वे स्थानक, दादर रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक, वांद्रे रेल्वे स्थानक, दादर मेट्रो स्टेशन, विमानतळ, गेट वे, सिद्धिविनायक मंदिर, स्वामी नारायण मंदिर, गिरगाव आणि जुहू चौपाटीवर तसेच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. त्याचप्रमाणे रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
त्याचप्रमाणे हॉटेल, गेस्ट हाऊस या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची माहिती घेण्यासाठी स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. श्वानपथक, बॉम्बनाशक पथकाना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य एटीएसने देखील मुंबईसह संपूर्ण राज्यात संशयितावर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. एखादी संशयित व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास तत्काळ मुंबई पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे.








