प्रतिनिधी/ बेळगाव
जमीन वादातून हिडकल (ता. रायबाग) येथील एका युवकाचा खून करण्यात आला आहे. हारुगेरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
लक्काप्पा रामप्पा बबल्यागोळ (वय 37) रा. हिडकल असे त्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. जमीन वादातून गेल्या गुरुवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्याच्यावर चाकूहल्ला झाला होता. चाकूहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला बेळगाव येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. दि. 7 फेब्रुवारी रोजी यासंबंधी खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून मलकारी हुडेदमनी, हालाप्पा बबल्यागोळ, विठ्ठल खनदाळ, लक्ष्मण बबल्यागोळ या चौघा जणांविरुद्ध हारुगेरी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले होते. लक्काप्पाची पत्नी सीमा यांनी फिर्याद दिली होती.
हारुगेरी पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करण्यात आली. मोटारसायकलवरून जाणाऱ्या लक्काप्पावर चाकूहल्ला करून त्याला उसाच्या फडात टाकून देण्यात आले होते. पत्नीने यासंबंधी पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. हारुगेरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









