प्रकल्पाला विरोध : बेळगाव, संकेश्वर अन् हुक्केरीत चिंता, भविष्यात पाण्याचा प्रश्न
बेळगाव : बेळगावसह हुक्केरी आणि संकेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प सुरू झाला आहे. याबाबत जिल्ह्यात आता खळबळ माजली आहे. आधीच बेळगाव शहराला पाणी टंचाईची समस्या कायम आहे. त्यात आता हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी घातली जात आहे. या प्रकल्पाला शेतकऱ्यांसह शहरातील विविध संघटनांनी विरोध केला आहे.
सौंदत्ती येथील मलप्रभा नदीवरील नवलतीर्थ जलाशयातून हुबळी-धारवाडला पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता हिडकल जलाशयातूनही धारवाड औद्योगिक क्षेत्राला 25 एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी घिसाडघाई सुरू झाली आहे. हिडकलमधून धारवाडकडे पाणी नेण्यासाठी गोकाक व बैलहोंगल तालुक्यातील शिवारांमध्ये खोदाई केली जात आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा कोणतीही नोटीस न बजावता हे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाला विरोध केला आहे.
हिडकल जलाशयाची क्षमता
घटप्रभा नदीवरील हिडकल जलशयाची क्षमता 51 टीएमसी आहे. दरम्यान पावसाळ्यात 48.98 टीएमसी पाणी जमा होते. सद्यस्थितीत 1.89 टीएमसी पाणी हुक्केरी, संकेश्वर आणि बेळगाव शहराला दिले जाते. त्या बरोबर सिंचनासाठी वेळोवेळी कालव्यातून पाणी सोडले जाते. शिवाय जलजीवन मिशन अभियानांतर्गत अनेक गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र याच हिडकल जलाशयातील पाण्याचा पुरवठा धारवाड औद्योगिक क्षेत्राला करण्यासाठी प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव, हुक्केरी आणि संकेश्वर शहरातील जनतेची चिंता वाढली आहे.
शिवारातून जलवाहिनी
धारवाड येथील औद्योगिक क्षेत्राला हिडकल जलाशयातून पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गोकाक आणि बैलहोंगल तालुक्यातील शिवारातून जलवाहिनी घातली जात आहे. एकूण 80 कि. मी. लांबीची जलवाहिनी घालण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 313 कोटी रुपयांचा करार एका कंपनीबरोबर करण्यात आला. त्यामुळे पिकांचे नुकसान होणार आहे. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकलमधील पाण्याचा पुरवठा धारवाड येथील औद्योगिक क्षेत्राला केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची चिंता व्यक्त होत आहे.









