आज शहरात पाणीपुरवठा पूर्ववत होणार : एलअॅण्डटीकडून प्रयत्न
बेळगाव : पाच्छापूर गावानजीक हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती तब्बल बारा तासांनंतर काढण्यात एलअॅण्डटी कंपनीला यश आले आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला रविवारी पहाटे पाच्छापूर गावानजीकच्या ब्रिजजवळ मोठी गळती लागली होती. त्यामुळे ही माहिती समजताच एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, सदर गळती शेतातून गेलेल्या जलवाहिनीला लागल्याने त्याठिकाणी खोदकाम करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे शेतकऱ्यांची मनधरणी करण्यास दुपारपर्यंत वेळ लागला. दुपारी 4 नंतर खोदकाम करून गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. रात्रंदिवस दोन शिफ्टमध्ये काम करून सोमवारी सायं. 4.30 पर्यंत गळती काढण्याचे काम पूर्ण झाले.
हिडकल जलाशय ते बेळगावपर्यंत घालण्यात आलेली जलवाहिनी सिमेंटची असून ती 35 वर्षांपूर्वी घालण्यात आली आहे. त्यामुळे जलवाहिनी सातत्याने नादुऊस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. एलअॅण्डटीकडून 5 किलोमीटरपर्यंतची जलवाहिनी नव्याने घालण्यात आली आहे. तर 1 किलोमीटरपर्यंतची जलवाहिनी जुनी आहे. येत्या 15 ते 20 दिवसांत नवीन जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण होणार असल्याचे एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गळती लागलेल्या ठिकाणी लोखंडी पाईप घालून त्याला वेल्डिंग मारण्यात आले आहे. सायंकाळी 5 नंतर कमी दाबाने पाणीपुरवठा करून चाचणी केल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या काळात राकसकोप जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, पाणीपुरवठा कमी दाबाने सोडण्यात आल्याने पाण्याची मागणी असलेल्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जलवाहिनीच्या दुऊस्तीचे काम पूर्ण झाल्याने मंगळवारी शहरात पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे.









