एलअँडटीकडून युद्ध पातळीवर काम : सायंकाळपासून पाणीपुरवठा पूर्ववत
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने सोमवार दि. 31 मार्चपासून दक्षिण आणि उत्तर विभागातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. एलअँडटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेत सोमवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे मंगळवार दि. 1 एप्रिल सायंकाळपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याचे एलअँडटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाची मुख्य जलवाहिनी अत्यंत जुनी आहे. सिमेंटची जलवाहिनी असून तिला वारंवार गळती लागत आहे. त्याचबरोबर राकसकोप जलाशयातून लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे येणाऱ्या जलवाहिनीलाही गळती लागत असल्याने शहराचा पाणीपुरवठा सातत्याने खंडित होत आहे.
अलीकडेच हिडकल जलाशयाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली होती. त्यामुळे दोन दिवस शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता. त्यानंतर आता हिडकलहून बसवणकोळ्ळ जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे येणाऱ्या 900 एमएम पीएससी जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव मंगळवार आणि बुधवारी दक्षिण व उत्तर विभागात पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार असल्याचे एलअँडटीकडून कळविण्यात आले होते. मात्र सोमवारी मध्यरात्रीच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ऐन उन्हाळ्यात शहराचा पाणीपुरवठा वेगवेगळ्या कारणास्तव ठप्प होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 24 तास पाणी योजनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवार दि. 3 रोजी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एलअँडटी कंपनीला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.









