मालकासमवेत 7 जणांवर अश्लील चित्रणाचा आरोप
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या लाहोर येथील एका गर्ल्स हॉस्टेलच्या वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांद्वारे हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या युवतींचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात येत होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हॉस्टेलमध्ये राहत असलेल्या एका युवतीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी हॉस्टेलवर छापा टाकत वॉशरुममध्ये असलेले छुपे कॅमेरे हस्तगत केले आहेत. या हॉस्टेलमध्ये सुमारे 40 युवती राहत होत्या. या सर्व युवतींना हॉस्टेल त्वरित सोडावे असे सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी या सर्व 40 युवतींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे आढळून आल्याचे या युवतींनी सांगितले आहे. तर हॉस्टेलवर पोलीस पोहोचण्यापूर्वीच सर्व आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी या सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहेत.
पाकिस्तानात काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारच्या एका प्रकरणाचा खुलासा झाला होता. यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरच्या इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ सापडले होते. या व्हिडिओंची संख्या सुमारे 5500 इतकी होती. आरोपी विद्यार्थिनींना चांगले गुण मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून अश्लील व्हिडिओ तयार करत होता. या विद्यापीठाच्या 113 विद्यार्थिनी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. विद्यापीठातील एक प्राध्यापकच अमली पदार्थांची विक्री करत होता.
पोलिसांनी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर अबुजर, सुरक्षा अधिकारी सैयद एजाज शाह आणि अल्ताफ नावाच्या एका इसमाला अटक केली होती. पोलिसांनी 22 जुलै रोजी विद्यापीठात तपासणी केली होती.