महापालिकेचा पुढाकार : व्यापारी, हमाल, नागरिकांची होणार सोय
बेळगाव : रविवार पेठेतील व्यापारी, हमाल आणि नागरिकांच्या सोयीसाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेतून महापालिकेच्यावतीने सुमारे 30 लाख रुपये खर्चून हायटेक शौचालय आणि स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. सोमवारी तेथील जुने स्वच्छतागृह काढण्यात आले. नवीन शौचालय व स्वच्छतागृहाचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण केले जाणार आहे. तसेच या ठिकाणी आंघोळीसाठी येणाऱ्यांना गरम पाणीदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. रविवार पेठेतील महानगरपालिकेची जागा या पूर्वी करारपत्रावर व्यापारी संघाला वापरण्यासाठी देण्यात आली होती. तसेच त्या ठिकाणी शौचालयदेखील होते. पण गेल्या काही दिवसापासून शौचालयाचा वापर होत नव्हता. तसेच परिसरात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले होते.
महापालिकेने दिलेल्या जागेचा करार संपत आल्याने त्याठिकाणी शौचालय व स्वच्छतागृह बांधून देण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. रविवार पेठ हा परिसर प्रभाग क्र. 4 मध्ये येतो. नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी पुढाकार घेत स्वच्छ भारत योजनेतून महानगरपालिकेच्या निधीतून या कामी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. सदर शौचालय आणि स्वच्छतागृह रेडीमेड स्वरुपातील असणार आहे. 20 बाय 40 आकाराचे शौचालय आणि स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून याचा लाभ तेथील व्यापारी, हमाल आणि नागरिकांना होणार आहे. त्याचबरोबर आंघोळीसाठी 15 रुपयांमध्ये एक बादली गरम पाणी देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्या ठिकाणचे जुने शौचालय सोमवारी पाडण्यात आले.
महिनाभरात काम पूर्ण
लागलीच नवीन शौचालय व स्वच्छतागृह उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होणार आहे. याचबरोबर प्रभाग क्र. 4 मध्ये गटारी, त्याचबरोबर कांदा मार्केट येथील भजी विक्रेत्यांना बसण्यासाठी पेव्हर्सदेखील घालून दिले जाणार आहेत. हायटेक शौचालय व स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.









