गैरसोय अधिक असल्याने प्रवाशांतून संताप : रात्री-अपरात्री दाखल होणारे प्रवासी रामभरोसे
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकावर सामान्य प्रतीक्षालय (कॉमन वेटिंगरुम) सध्या समस्येच्या गर्तेत सापडले आहे. मागील महिनाभरापासून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच अस्वच्छता असल्याने प्रवाशांनी तक्रारीही केल्या आहेत. परंतु, पाणी उपलब्ध करून देण्यात रेल्वे अधिकारी असमर्थ ठरल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सामान्य प्रतीक्षालय तसेच एक वातानुकूलित प्रतीक्षालय उभारण्यात आली आहेत. बेळगावमधून दररोज शेकडो प्रवाशांची ये-जा सुरू असते. विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्यांनी मध्यरात्री दाखल झाल्यानंतर अनेक प्रवासी प्रतीक्षालयाचा आसरा घेतात. परंतु, या ठिकाणी स्वच्छता नसल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून केली जात आहे. तसेच स्वच्छतागृहात पाण्याची कमतरता भासत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील सामान्य प्रतीक्षालयात पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
वातानुकूलित प्रतीक्षालय बंदच
रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारीच वातानुकूलित प्रतीक्षालय बांधण्यात आले आहे. ज्या प्रवाशांना सामान्य प्रतीक्षालयात थांबायचे नाही, त्यांना वातानुकूलित प्रतीक्षालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु, मागील सहा महिन्यांपासून या प्रतीक्षालयाला टाळे लावण्यात आले आहेत. प्रतीक्षालयाच्या स्वच्छतेसाठी अद्याप टेंडर निघालेले नसल्याचे कारण रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. परंतु, या कारणामुळे मागील सहा महिन्यांपासून वातानुकूलित प्रतीक्षालय बंद आहे. यामुळे फर्स्ट, सेकंड व थर्डक्लास वातानुकूलित प्रवास करून आलेल्या प्रवाशांनाही सामान्य प्रतीक्षालयाचाच आधार घ्यावा लागत आहे.
पाण्याची सोय नसल्याच्या तक्रारी
सामान्य प्रतीक्षालयात मागील महिनाभरापासून पाण्याची सोय नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून मध्यरात्री दाखल झालेल्या प्रवाशांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. ही बाब रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली जाणार आहे.
– प्रसाद कुलकर्णी (सल्लागार समिती सदस्य)









