दोनच वर्षात स्लॅबला गळती : कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह : प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
बेळगाव : कोट्यावधी रुपये खर्च करून बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. परंतु, हा निधी वाया गेला की काय? असा प्रश्न सध्या प्रवाशांमधून विचारण्यात येत आहे. प्रवेशद्वारानजीकच दोन ठिकाणी गळती लागली असून तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांवर भिजण्याची वेळ येत आहे. अवघ्या दोनच वर्षात स्लॅबला गळती लागल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तब्बल 190 कोटी रुपये खर्च करून 2023 मध्ये बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. एखाद्या विमानतळ टर्मिनलप्रमाणे या ठिकाणी भव्य इमारत उभारण्यात आली. हायटेक रेल्वेस्थानक उभारल्याबद्दल मोठा गाजावाजा झाला.
परंतु, रेल्वेस्थानकाच्या इमारतीला पहिल्याच वर्षी गळती लागली होती. त्यावेळी ही गळती कमी असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, सध्या मात्र अनेक ठिकाणी छतातून पाणी गळत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिकीट काऊंटर समोरच छताला गळती लागली आहे. काऊंटरसमोर असलेल्या खुर्च्यांवरही छताच्या गळतीचे पाणी पडत असल्याने नागरिकांना त्या ठिकाणी बसता येत नाही. त्याचबरोबर रेल्वेस्थानकाच्या दुसऱ्या कोपऱ्यात अशाच प्रकारे गळती लागली आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी बरेच प्रवासी आसरा घेतात. परंतु, पावसामुळे संपूर्ण परिसरात पाणीच पाणी होत असल्याने झोपणेही अवघड होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
दुरुस्तीचे काम केले जाईल
रेल्वेस्थानकाच्या छताला गळती लागल्याबाबतची माहिती अद्याप आपल्याकडे नाही. परंतु, प्रवाशांची गैरसोय होत असेल तर याबाबत डीआरएमसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब कळवून दुरुस्तीचे काम केले जाईल.
– मंजुनाथ कलमाडी,(रेल्वे जनसंपर्क अधिकारी)









