90 टक्के काम पूर्ण : महिन्याभरात काम पूर्ण होण्याची शक्यता : भव्य प्रवेशद्वार, पार्किंगची व्यवस्था, सरकते जिने, कोचिंग डेपोसह अनेक सोयी-सुविधा रेल्वेस्थानकामध्ये उपलब्ध

प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावमधील सुसज्ज रेल्वेस्थानकाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून सप्टेंबरअखेर काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱयांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या महिन्याभरात अत्याधुनिक रेल्वेस्थानक बेळगावकरांच्या सेवेमध्ये रूजू होणार आहे.
28 फेब्रुवारी 2019 रोजी तत्कालिन खासदार सुरेश अंगडी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन झाले तरी टेंडर मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब झाला. त्यातच मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागू झाल्याने कामामध्ये खंड पडला. या दरम्यान खासदार अंगडी यांचे निधन झाल्याने कामाची गती आणखी मंदावली. 2021 मध्ये रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु विलंबामुळे सप्टेंबर 2022 उजाडला तरी अद्याप 10 टक्के काम बाकी आहे.

1887 मध्ये ब्रिटिशांच्या काळात बेळगाव रेल्वेस्थानक सुरू झाले. ब्रिटिशकालीन इमारत निकामी झाल्यामुळे नूतनीकरण करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी 12 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. विमानतळाच्या टर्मिनलप्रमाणे सुसज्ज सेवा देणारे हायटेक रेल्वेस्थानक बेळगावमध्ये केले जात आहे. भव्य प्रवेशद्वार, पार्किंगची व्यवस्था, शहराच्या दक्षिण बाजूने दुसरा दरवाजा, सरकते जिने, कोचिंग डेपो अशा सुविधा नवीन रेल्वेस्थानकामध्ये ग्राहकांना मिळणार आहेत.

बेळगाव रेल्वेस्थानकातून दररोज 10 ते 12 हजार प्रवाशांची ये-जा असते. सध्या सर्व एक्स्प्रेस व अनारक्षित रेल्वे पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या पुन्हा वाढत आहे. वाढत्या प्रवाशी संख्येप्रमाणेच सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर बेळगावमध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटना व व्यक्तींची शिल्पे लावण्यात आली आहेत. नवीन प्रवेशद्वाराच्या आत प्रवाशांसाठी मोठा परिसर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
दक्षिण प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात
शहराच्या दक्षिण भागातील प्रवाशांना रेल्वेस्थानकात जाणे सोयीचे व्हावे यासाठी शास्त्रीनगर येथे दक्षिण प्रवेशद्वार करण्यात आले आहे. नर्तकी थिएटर रोडपासून काही अंतरावर सुसज्ज प्रवेशद्वार उभारण्यात आले असून, या ठिकाणी पेव्हर्स बसविणे व रंगकाम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रवाशांना ओव्हर फूटब्रिजवरून थेट पहिल्या व दुसऱया प्लॅटफॉर्मवर पोहोचता येणार आहे. दक्षिण प्रवेशद्वारामुळे शहापूर, वडगाव, जुने बेळगाव व ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होणार आहे.
दोन ठिकाणी सरकते जिने
रेल्वेस्थानकात सध्या ज्या ठिकाणी प्रवेशद्वार आहे, त्या ठिकाणी एक जुना फूटओव्हरब्रिज आहे. आता काही अंतरावर नवीन फूटओव्हरब्रिज तयार करण्यात आला आहे. या नव्या ब्रिजवरून प्रवाशांना पहिल्या प्लॅटफॉर्मवरून दक्षिण प्रवेद्वारापर्यंत पोहोचता येईल. लहान मुले, महिला, वयोवृद्ध व दिव्यांगांना फूटओव्हरब्रिजवरील पायऱयांवरून चढणे कठीण जात होते. यासाठी दोन ठिकाणी सरकते जिने (एक्सिलेटर) बसविले आहेत.









