मनपा अधिकाऱ्यांनी केली पाहणी : कामे लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन
बेळगाव : खासबाग परिसरात स्वच्छतागृह तसेच मुतारी नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. त्याबाबत नगरसेवक रवी साळुंखे यांनी वारंवार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून या ठिकाणी स्वच्छतागृहाची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार गेल्या बुधवारी महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी या परिसराला भेट देवून पाहणी केली. याबाबत आराखडा तयार करून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. खासबाग फिश मार्केट परिसरात असलेल्या शौचालय व मुतारीला दरवाजेच नाहीत. त्यामुळे महिलांची मोठी गैरसोय होत आहे. शौचालय व मुतारीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याचीही पाहणी करून तातडीने याची सर्व दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. खासबाग येथे ‘हायटेक पे टॉयलेट’ उभे केले जाईल. त्यामुळे रविवारी भरविण्यात येणाऱ्या बाजारातील विक्रेत्यांना त्याचा फायदा होईल, असे सांगण्यात आले. याचबरोबर या परिसरातील नाल्याचीही पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी अजूनही नाल्यावर आणि गटारींवर स्लॅब घालणे गरजेचे आहे. ते कामही पूर्ण करावे, असे नगरसेवक रवी साळुंखे यांनी सांगितले. तेही काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे सांगून तेथे आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने याबाबतचा संपूर्ण आराखडा तयार करावा, असे लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले आहे. यावेळी इतर अधिकारी उपस्थित होते.









