65 कोटींची योजना : 16 एकर जागेत जिल्हा क्रीडांगण, हॉकी मैदान, इनडोअरचीही सोय
बेळगाव : जिल्ह्यात अत्याधुनिक (हायटेक) व सुसज्ज क्रीडांगण असावे, ही क्रीडाप्रेमींची अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. रामतीर्थनगरात 16 एकर जागेत 65 कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक जिल्हा क्रीडांगण उभारण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच लोकार्पण होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेच्या अनुदानातून क्रीडांगण उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील काम प्रगतिपथावर असून दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात होईल, अशी आशा आहे. नेहरूनगरात सध्या असलेल्या जिल्हा क्रीडांगणाच्या लिजचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे स्वत:चे जिल्हा क्रीडांगण असावे, या विचारातून बेळगाव महानगर विकास प्राधिकरणने (बुडा) जिल्हा प्रशासनाला जागा मंजूर केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून क्रीडांगणाचे काम सुरू असून पहिल्या टप्प्यात जागेचे सपाटीकरण होत आहे. क्रीडांगणावर प्रेक्षादालन, क्रीडांगणाच्या सभोवताली ट्रॅक उभारणे यासह अन्य काही कामेही करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हॉकी-इनडोअर गेम्ससाठी क्रीडांगण
10 एकर जागेमध्ये जिल्हा क्रीडांगण उभारणार असून या क्रीडांगणाच्या शेजारीच 6 एकर जागेमध्ये इनडोअर ग्राऊंड, जलतरण तलाव व हॉकी मैदान उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यात हॉकी मैदान नसल्याने मागील 12 वर्षांपासून हॉकीसाठी मैदान उभारण्याचे प्रयत्न सुरू होते. आता रामतीर्थनगरात भव्य क्रीडांगण होत असून क्रीडापटूंची सोय होणार आहे.
शहराला हॉकीचा इतिहास
बेळगाव शहराला हॉकीचा इतिहास आहे. त्यामुळे 2 वर्षांपूर्वी शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान उभारण्यासाठी तयारी सुरू होती. केंद्र आणि राज्य सरकारात पत्रव्यवहारही झाला होता. मात्र, काही कारणांमुळे हॉकी मैदानाची योजना बाजूला राहिली. त्यामुळे हॉकीपटूंमध्ये तीव्र नाराजी होती. आता रामतीर्थनगरात उभारण्यात येणाऱ्या हायटेक क्रीडांगणामुळे हॉकीपटूंचीही सोय होणार आहे. बेळगाव शहराने हॉकीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळविले आहे. जिल्ह्यातील 3 हॉकीपटूंनी ऑलिंपिकमध्ये बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. युनिव्हर्सिटी ब्लूच्या तुकडीमध्ये 11 जणांपैकी 9 बेळगावचे असायचे. बेळगावमध्ये 2012 मध्ये झालेल्या ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंटने जिल्ह्यातील हॉकीपटूंत उत्साह निर्माण केला होता. त्यानंतरच्या काळामध्ये राज्य व जिल्हास्तरावर काही टुर्नामेंट बेळगावतच झाल्या होत्या, अशा आठवणी हॉकीपटू सांगतात.
क्रीडाप्रेमींची सोय होणार
रामतीर्थनगरमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याकडून जिल्हा क्रीडांगणाचे काम सुरू आहे. 10 एकर जागेत क्रीडांगण व त्याच्या शेजारी 6 एकर जागेमध्ये इनडोअर गेम्ससाठी क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. ही दोन्ही क्रीडांगणे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींना सोयीची होतील.
– एस. एस. सोबरद, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम खाते, बेळगाव विभाग









