मुलांवर रॉकेट डागणाऱ्या दहशतवाद्याला संपविले
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलच्या सैन्याने हिजबुल्लाहच्या आणखी एक टॉप कमांडरला यमसदनी पाठविले आहे. या दहशतवाद्याचे नाव जाफर खादर फाउर असून तो मागील वर्षापासून इस्रायलमध्ये झालेल्या अनेक रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार होता. यात जुलै 2024 चा हल्ला देखील सामील आहे, ज्यात फूटबॉल मैदानावर रॉकेट कोसळून 12 मुलांचा मृत्यू झाला होता. खादर हा दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या नासिर ब्रिगेड रॉकेट युनिटचा कमांडर होता.
खादरला लेबनॉनच्या जौइया क्षेत्रात ठार करण्यात आले आहे. तो गोलानच्या दिशेने करण्यात आलेल्या अनेक रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार होता असे आयडीएफकडून सांगण्यात आले.
यापूर्वी इस्रायलच्या नौदलाने उत्तर लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला पकडले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु उत्तर लेबनॉनच्या बातरुन शहरात ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. बातरुनच्या किनाऱ्यावर उतरलेल्या शस्त्रसज्ज लोकांच्या समुहाला स्वत:सोबत नेणाऱ्या नेव्ही कॅप्टनला इस्रायलने ताब्यात घेतले आहे का याचा तपास करत आहोत असे लेबनॉनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.









