श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिह्यातील कोकरनाग भागात शुक्रवारी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेली चकमक रात्री उशिरा संपली. या संघर्षात सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. जुनैद आणि बासित भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. 2021 मध्ये एका सरपंचाच्या हत्येशिवाय भाजपचे सरपंच रसूल दार आणि त्यांच्या पत्नीच्या हत्येमध्ये बासितचा सहभाग होता.
हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा जुनैद आणि बासित भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे असल्याचे काश्मीरच्या आयजीपींनी स्पष्ट केले. गेल्यावषी 9 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भाजपचे सरपंच गुलाम रसूल दार आणि त्यांच्या पत्नीची अज्ञात बंदूकधाऱयांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. या हत्या प्रकरणात या दहशतवाद्यांचा सहभाग होता. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिह्यातील गोपालपोरा भागात 31 मे रोजी झालेल्या शाळेतील शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येमध्ये सहभागी दोन दहशतवादी गुरुवारी चकमकीत ठार झाले होते.









