आयएमईआर परिसरातील प्रकार : गळतीची दुरुस्ती करण्यापूर्वीच रस्त्यावर काँक्रिट घातल्याने समस्या, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव
राकसकोप आणि हिडकल जलाशयाच्या माध्यमातून शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहर आणि उपनगरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळते. शहरात इतके मुबलक पाणी असून आयएमईआरसमोर आरपीडी रस्त्यावरील दुभाजकामधून नळाप्रमाणे पाणी वाहतेय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांमधूनही पाणी वाहत आहे. त्यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आरपीडी कॉर्नर ते येळळूर रोडपर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रीटीकरण करण्यात आले आहे. तसेच रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बांधून पथदीप उभारण्यात आले आहेत. मात्र आयएमईआरजवळ दुभाजकामधून नळाप्रमाणे पाणी वाहत असून येथील काँक्रिटच्या रस्त्यामधूनदेखील मोठय़ाप्रमाणात पाणी वाहते. परिणामी रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. दुभाजकामधून नळाप्रमाणे वाहणारे पाणी पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती घेतली असता जलवाहिनीला लागलेल्या गळतीद्वारे पाणी वाया जात असल्याचे सांगण्यात आले.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी कोटय़वधीचा निधी खर्चून विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र विविध खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे. विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्मार्ट रस्ते बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण रस्ते निर्माण करताना आवश्यक खबरदारी आणि कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र कोणत्याच विभागाशी समन्वय साधून विकासकामे केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही विभागाकडून स्मार्ट सिटी कंपनीला सहकार्य मिळत नसल्याचेही दिसून आले आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी जलवाहिन्यांच्या गळतीचे निवारण करणे गरजेचे होते. पण याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याची बाब निदर्शनास आली. आरपीडी क्राँस ते येळ्ळूररोड क्रॉसपर्यंतच्या आरपीडी रोडचे काँक्रिटकरण करण्यात आले. पण आयएमईआरसमोर गळतीची दुरुस्ती करण्यापूर्वीच रस्त्यावर काँक्रिट घातले आहे. त्यामुळे येथे काँक्रिट केलेल्या रस्त्यामधूनही गळतीवाटे पाणी वाहत आहे.
गळतीचे निवारण करण्यास पाणीपुरवठा मंडळ अपयशी
या ठिकाणी यापूर्वीपासूनच जलवाहिनीला गळती लागली होती. रस्ता रुंदीकरणावेळी गळतीचे निवारण करण्यात आले होते. पण गळती निवारणाचे काम व्यवस्थित झाले नसल्याने पाणी वाहत होते. सदर ठिकाणी लागलेल्या गळतीद्वारे गेल्या 5 वर्षांपासून पाणी वाया जाते. गळतीचे निवारण करण्यास पाणीपुरवठा मंडळदेखील अपयशी ठरले. लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्रामधून हिंदवाडीमधील घुमटमाळ येथील जलकुंभामध्ये पाणी येते. त्या ठिकाणाहून सर्वत्र पाणीपुरवठा केला जातो. येथील मुख्य वाहिनीलाच ही गळती लागल्याने 24 तास पाणी वाया जाते. सदर ठिकाणी जलवाहिनीला गळती लागल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाला होती. तरीही पाणीपुरवठा मंडळाने कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच गळतीद्वारे पाणी वाया जात होते.
नागरिकांतून तीव्र नाराजी
रस्त्याच्या काँक्रिटीकरणापूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम किंवा जलवाहिनी बदलण्याचे काम करणे आवश्यक होते. मात्र स्मार्ट सिटी कंपनीनेदेखील या गळतीकडे दुर्लक्ष करून काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. परिणामी आता काँक्रिट केलेल्या रस्त्यामधून गळतीद्वारे पाणी वाहत आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून, याकडे एलऍण्डटी कंपनीने कानाडोळा केला आहे. एकीकडे उपनगरात पाण्याचा पुरवठा सुरळीत केला जात नाही, तर दुसरीकडे गळतीद्वारे पाणी वाया जात असते. त्यामुळे याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर गळतीचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.









