वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची गैरसोय
वार्ताहर/ धामणे
वडगाव धामणे रोड शेजारी असलेल्या हेस्कॉम मेन स्टेशनच्या गलथान कारभारामुळे रविवार दि. 29 रोजी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे धामणे, येळ्ळूर, अवचारहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी, कुरबरहट्टी, सुळगा (ये.), राजहंसगड, देसूर या संपूर्ण भागात अंधाराचे साम्राज्य पसरल्याने या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. असे प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
या भागात शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रात्रभर अचानक लाईट गेल्यास शेतकरी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सकाळच्या वेळी लाईट नसल्याने स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींनाही त्रासदायक होत असल्याने या भागातील अनेक महिला हेस्कॉमच्या या गलथान कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.
वडगाव-धामणे रोडवर असलेल्या हेस्कॉमच्या मेन स्टेशनहून धामणे, चारी हट्ट्या, येळ्ळूर, यरमाळ, सुळगा (ये.), राजहंसगड, देसूर या ग्रामीण भागाला विद्युत पुरवठा केला जातो. परंतु राजहंसगड किंवा देसूर या भागात कुठेही विद्युत पुरवठ्यात बिघाड झाली तर वडगाव मेन स्टेशनवरुन या भागातील सर्व गावांचा विद्युत पुरवठा खंडित करून विद्युतपुरवठा सुरळीत करण्याचे काम हेस्कॉमचे कर्मचारी करतात. त्यामुळे या भागातील सर्वच गावांना अंधाराचा सामना करावा लागतो.









