बेळगाव-हुबळी विभागात 900 कोटींची थकबाकी : सरकारी कार्यालये बिल थकविण्यात आघाडीवर
प्रतिनिधी /बेळगाव
वीजबिलाची थकबाकी वाढल्याने हेस्कॉमची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस डळमळीत होत आहे. सध्या हेस्कॉमची बेळगाव व हुबळी विभागात 900 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 500 कोटी रुपये थकबाकी सरकारी कार्यालयांची असल्याने हेस्कॉम डबघाईला येत आहे. त्यामुळे या पुढील काळात कठोर कारवाई करण्याचा इशारा हेस्कॉमने दिला आहे.
वीजबिल भरण्यास एक दिवस वेळ झाला तरी सामान्य ग्राहकांच्या घरचे कनेक्शन तोडण्यात येते. परंतु सरकारी कार्यालयांनी मोठय़ा प्रमाणात बिलाची थकबाकी केली आहे. बेळगावमध्येही मनपा, कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा पंचायत, ग्राम पंचायत कार्यालयांची थकबाकी आहे. मध्यंतरी बेळगाव तालुक्मयातील अनेक ग्राम पंचायतींचा वीजपुरवठा तोडण्यात आला होता. त्याचबरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डचाही वीजपुरवठा तोडण्यात आल्याने बरेच दिवस हा परिसर अंधारात होता.
व्याजासहीत वसूल करणार बिल
हेस्कॉमला केपीटीसीएलकडून विजेची खरेदी करावी लागते. परंतु थकबाकी वाढल्याने वीज खरेदीत व्यत्यय येत आहे. बेळगाव व हुबळी या दोन जिल्हय़ांमध्ये एकूण 900 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी 500 कोटी सरकारी कार्यालयांचे आहेत. बिल दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत बिल भरणे आवश्यक आहे. 30 दिवसांनंतर थकीत वीजबिल व्याजासह वसूल करण्याचा निर्णय हेस्कॉमने घेतला आहे.
बिल न भरल्यास कारवाई करणार
सरकारी कार्यालयांची थकबाकी 500 कोटींवर पोहोचली आहे. महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, जिल्हा पंचायत, ग्राम पंचायत या कार्यालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. संबंधित अधिकाऱयांना पत्रे पाठविण्यात आली असून लवकर बिल न भरल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
– भारती डी. (व्यवस्थापकीय संचालक, हेस्कॉम)









