शहरातील धोकादायक कनेक्शनची घेतली माहिती
बेळगाव : टेंगिनकेरा गल्ली येथे दोन दिवसांपूर्वी विजेचा धक्का लागून एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हेस्कॉम प्रशासनाला जाग आली असून, शुक्रवारी बाजारपेठेत ज्या-ज्या ठिकाणी विद्युतखांबांना लागून व्यवसाय केले जातात, त्यांना ताकीद देण्यात आली. त्याचबरोबर धोकादायक ठिकाणांची पाहणी करून संबंधितांना सूचना करण्यात आल्या. भाजीविक्री करणाऱ्या कंग्राळी बुद्रुक येथील सोमव्वा काडेरुद्रन्नावर यांना विजेचा धक्का लागला. ट्रान्स्फॉर्मरखाली त्या भाजीविक्री करीत होत्या. त्यामुळे विजेच्या एका वाहिनीला त्यांचा स्पर्श होताच यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. बाजारपेठेत अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मरखाली लहान-सहान साहित्यविक्रीचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. अशा सर्व विक्रेत्यांना हेस्कॉमकडून ताकीद देण्यात आली आहे. शुक्रवारी हेस्कॉमचे अधिकारी व इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर यांनी बाजारपेठेत असणाऱ्या धोकादायक कनेक्शनची माहिती घेतली. बऱ्याच नागरिकांनी विद्युत कनेक्शनशेजारी लोखंडी खांब तसेच इतर साहित्य उभे केले आहे. एखाद्यावेळेस विद्युतवाहिनीचा स्पर्श झाल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते राजेंद्र वाघफाटे यांच्या नेतृत्वाखाली टेंगीनकेरा गल्ली, मेणसी गल्ली परिसरात पाहणी करण्यात आली. ट्रान्स्फॉर्मरखाली बसून साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनाही सूचना करून दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.









