वीजखांबांवरील जंजाळ कमी करण्याचा प्रयत्न : केबल जमिनीपासून नऊ फुटावर असण्याची गरज
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात अनेक केबल ऑपरेटर्स तसेच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या केबल ओढल्या आहेत. बऱ्याच केबल या हेस्कॉमच्या वीजखांबांवरून ओढण्यात आल्या असल्याने सर्वत्र केबल्सचे जंजाळ पहायला मिळत आहे. त्यामुळे नियमानुसार जमिनीपासून नऊ फुटाच्या वर केबल्स ओढाव्यात अन्यथा कारवाईचा इशारा हेस्कॉमकडून देण्यात आला आहे.
केबल ऑपरेटर कंपन्या तसेच दूरसंचार व इंटरनेट प्रोव्हायडर एजन्सीकडून शहरात मनमानी कारभार सुरू आहे. आपल्याला हव्या त्या पद्धतीने केबल्स ओढण्यात आल्या आहेत. विशेषत: गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील रस्त्यांवर केबल्स आडव्या ओढल्या आहेत. यामुळे गणेशमूर्ती आणताना व विसर्जनावेळी अडचणी येत आहेत. तसेच विद्युत खांबांवर एकाखाली एक वाहिन्या ओढण्यात आल्याने वीजवाहिन्यांची ठिणगी पडल्यास अनेक वेळा दुर्घटना घडत आहेत.
केबलधारकांनी हेस्कॉमची परवानगी घेणे गरजेचे
हेस्कॉमने काही केबल ऑपरेटर्सना केबल ओढण्याची परवानगी दिली आहे. परंतु, काही जणांनी कोणतीही परवानगी न घेता हेस्कॉमच्या खांबांवरून केबल ओढल्या आहेत. यामुळे दुरुस्तीचे काम करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे हेस्कॉमने कारवाईचा इशारा दिला आहे. परवानगीविना ओढण्यात आलेल्या केबल कोणतीही पूर्वसूचना न देता काढल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी परवानगी घेणे आवश्यक आहे.
केबल्स ओढण्यासाठी परवानगीची गरज
गणेशोत्सव काळात गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जनावेळी केबल्समुळे अडथळे येत आहेत. तसेच हेस्कॉमच्या वीज खांबांवरून काही केबल्स विनापरवाना ओढण्यात आल्या आहेत. त्यामुळे परवानगी घेऊन 9 फुटाच्या वर केबल्स ओढाव्यात. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
मनोहर सुतार (हेस्कॉम कार्यकारी अभियंता)









