शहरात दिवसाकाठी 500 डिसकनेक्शन : बिल भरण्यासाठी ग्राहकांची धावपळ
बेळगाव : घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांकडून वेळच्या वेळी वीज बिल भरले जात नसल्याने हेस्कॉमकडून वीज कनेक्शन तोडले जात आहे. मागील चार दिवसांपासून बेळगाव शहर तसेच उपनगरामध्ये हेस्कॉमकडून कारवाई केली जात आहे. यामुळे बऱ्याच ग्राहकांनी मागील थकबाकी भरण्याची तयारी दर्शविली आहे. दिवसात 400 ते 500 डिसकनेक्शन केले जात असल्याने ग्राहकांना यापुढे तरी वेळच्या वेळी वीज बिल भरावे लागणार आहे. गृहज्योती योजनेमुळे वीज बिल पूर्णपणे मोफत झाल्याची भावना विद्युत ग्राहकांची झाली आहे. त्यामुळे आलेले वीज बिल भरले जात नसल्याने थकबाकी वाढली आहे. बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने हेस्कॉमच्या हुबळी येथील कार्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यानुसार वीज बिल वसुलीसाठी थकबाकीदारांवर कारवाई केली जात आहे.
बुधवारी सकाळी पांगूळ गल्ली, टेंगीनकेरा गल्ली, माळी गल्ली या परिसरात दुकानदार तसेच घरगुती ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात आले. मागील महिन्यात दिलेले वीज बिल अद्याप न भरलेल्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात आले. यामुळे काही ठिकाणी वादावादीचे प्रकारदेखील घडले. परंतु हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी फ्युज काढत जोवर बिल भरले जाणार नाही तोवर कनेक्शन जोडले जाणार नसल्याचे सांगितले. कनेक्शन तोडल्यानंतर हेस्कॉम कार्यालयात जाऊन बिलासोबत दंडाची रक्कम भरल्यानंतरच पुन्हा कनेक्शन जोडले जात आहे. शहरातील हेस्कॉम उपविभाग 1, 2 व 3 अंतर्गत दिवसामध्ये प्रत्येकी 100 ते 150 कनेक्शन तोडले जात आहेत. पुन्हा बिल भरल्यानंतर त्या ग्राहकांना जोडणी दिली जात आहे. या कारवाईमुळे मागील चार दिवसांत मोठ्या प्रमाणात थकबाकी हेस्कॉमकडे जमा झाली आहे. बऱ्याच व्यावसायिक ग्राहकांनी कोरोना काळातील थकबाकी देखील भरली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याठिकाणी भरावे विद्युत बिल
- हेस्कॉमची वेबसाईट अथवा पेटीएम, गुगल पे, फोन पे
- हेस्कॉमचे एटीपी काऊंटर-रेल्वे स्टेशन समोरील कार्यालय, गोवावेस, शहापूर, नेहरूनगर, खंजर गल्ली, उद्यमबाग
- बेळगाव वन-तहसीलदार कार्यालय, गोवावेस, अशोकनगर, टीव्ही सेंटर आणि वडगाव









