जिल्ह्यात 1601 वीज खांब तर 85 ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान
बेळगाव : वळीव आणि मान्सूनपूर्व पावसाने बेळगाव जिल्ह्याला झोडपून काढले. वादळ आणि मुसळधार पावसामुळे 1601 वीज खांब जमीनदोस्त झाले. तर 85 ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले आहे. याबरोबरच वीजवाहिन्यांचेही नुकसान झाले आहे. यामुळे हेस्कॉमला 1 कोटी 65 लाखांचा फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फटका खानापूर तालुक्यात बसल्याचे हेस्कॉमकडून स्पष्ट करण्यात आले आहे. वळीव व मान्सूनपूर्व पावसावेळी विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस होतो. बऱ्याचवेळा झाडे तसेच त्यांच्या फांद्या पडून वीजवाहिन्यांचे नुकसान होते. काही ठिकाणी वीज पडून ट्रान्स्फॉर्मर निकामी होते. मागील दोन महिन्यांत अशा प्रकारच्या पावसामुळे हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून बऱ्याच गावांमधील वीजपुरवठा ठप्प झाला होता. बेळगाव शहर व तालुका विभागात 134 विद्युत खांबांचे नुकसान झाले. खानापूर येथे 398, बैलहोंगल 50, कित्तूर 53, सौंदत्ती 160, रामदुर्ग व गोकाक येथे प्रत्येकी 63, मुडलगी येथे 41 विद्युत खांब कोसळले आहेत. एकूण 55 लाख 60 हजारांचे नुकसान झाले आहे. चिकोडी विभागात 110, निपाणी 43, अथणी 156, कागवाड 51, रायबाग 129, वीज खांबांचे नुकसान झाले आहे. एकूण चिकोडी 24 लाख 45 हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ट्रान्स्फॉर्मर खराब झाले आहेत. काही दुरुस्ती करणे अशक्य असल्यामुळे ते नव्याने बसवावे लागणार आहेत. दुरुस्तीसाठी 85 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
खानापूर तालुक्याला सर्वाधिक फटका
खानापूर तालुका हा जंगलाने वेढलेला असल्याने याठिकाणी हेस्कॉमला जोरदार फटका बसला. एकूण 398 वीज खांबांचे नुकसान झाले आहे. बीडी, इटगी, जांबोटी, लोंढा, नागरगाळी, लोकोळी, बाचोळी, करंबळ, कुसमळी आदी परिसरात हेस्कॉमचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने दुरुस्तीचे काम अवघड जात आहे.
90 टक्के वीजखांब-ट्रान्स्फॉर्मर पुन्हा बसविले
एप्रिल व मे महिन्यात पाऊस व वाऱ्यामुळे वीजखांब व ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाले होते. यापैकी 90 टक्के विजेचे खांब व ट्रान्स्फॉर्मर पुन्हा बसविण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यातील काही भागात दुरुस्तीचे काम आव्हानात्मक आहे. उर्वरित दुरुस्तीचे काम मान्सून सुरू होण्यापूर्वी पूर्ण केले जाणार आहे.
– प्रवीणकुमार चिकाडे, (हेस्कॉम मुख्य अभियंता)









