कडोलीतील शेतकऱ्यांनी घेतली 3 हजार मजुरी
बेळगाव : ट्रान्स्फॉर्मर ना दुरुस्त झाल्यानंतर तो बसविण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांना कडोलीच्या शेतकऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. दोन दिवस प्रतीक्षा करूनही ट्रान्स्फॉर्मर पाठविण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडून मजुरी म्हणून 3 हजार रुपये वसूल केले. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना धडा शिकविण्यात आला आहे. कडोली येथे नव्याने बसविण्यात आलेला इलेक्ट्रीक ट्रान्स्फॉर्मर केवळ बारा दिवसांत जळाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आणि तातडीने ट्रान्स्फॉर्मर बसविण्याची मागणी केली. मात्र शेतकऱ्यांना अनेकवेळा फसविण्यात आले.आज वाहनामध्ये ट्रान्स्फॉर्मर घातलेला आहे, घेऊन येतो, असे सांगितले. मात्र पत्ताच नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच जेरीस आणले. आम्ही दोन दिवस वाट पहात आहे, आमची मजुरी द्या, अशी मागणी करून त्यांच्याकडून तीन हजार रुपये मजुरी वसूल करण्यात आली.









