दोन दिवसाच्या पावसाने 47 विद्युतखांब, 8 ट्रान्स्फॉर्मरना फटका
बेळगाव : मान्सूनपूर्व पावसाने मागील दोन दिवसांत बेळगाव शहरासह उपनगरांना झोडपून काढले. सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे विद्युतवाहिन्या तसेच खांबांचे मोठे नुकसान झाले. बेळगाव शहरात एकूण 47 विद्युतखांब कोसळले. तर आठ ट्रान्स्फॉर्मर निकामी झाले. त्यामुळे 29 लाख 60 हजार रुपयांचा फटका हेस्कॉमला सहन करावा लागला. सोमवारी व मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे बरेच जुनाट वृक्ष उन्मळून पडले. तसेच काही मोठ्या वृक्षांच्या फांद्या विद्युतवाहिन्यांवर पडल्या. रात्रीच्यावेळी हा पाऊस झाल्याने दुरुस्तीच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करुर, राजेंद्र वाघफाटे व संजीव हम्मण्णावर यांनी बेळगाव शहर, उत्तर आणि दक्षिण विभागामध्ये विद्युतपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम पाहिले. दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 0.9 किलोमीटर लांबीच्या विद्युतवाहिनीचे त्याचबरोबर विद्युतखांब, ट्रान्स्फॉर्मर यांचेही नुकसान झाल्याने बऱ्याच भागात दोन दिवस वीजपुरवठा ठप्प होता. काही भागामध्ये दुरुस्तीचे काम करणे शक्य नसल्याने त्यांना दुसरीकडून वीजपुरवठा देण्यात आला. सोमवारच्या पावसात हेस्कॉमचे सर्वाधिक नुकसान झाले. बुधवारी दुपारपर्यंत विविध भागामध्ये हेस्कॉमचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करीत होते.
मध्यरात्रीपर्यंत शहराच्या महत्त्वाच्या भागात वीजपुरवठा सुरळीत
सोमवारी रात्री झालेल्या पावसामध्ये हेस्कॉमचे मोठे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा आणि पाऊस असल्यामुळे दुरुस्तीचे काम करणे शक्य नव्हते. पाऊस थांबल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत शहराच्या महत्त्वाच्या भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु, बऱ्याच भागात मोठे वृक्ष, विद्युतवाहिन्या कोसळल्याने दुरुस्तीचे काम करताना वेळ लागत होता. वीज पडून ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान झाल्याने मंगळवारी दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.
-विनोद करुर (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)
विभाग विद्युतखांब ट्रान्स्फॉर्मर
शहराचा मध्यवर्ती भाग (उपविभाग-1) 8 1
शहराचा दक्षिण भाग (उपविभाग-2) 13 4
शहराचा उत्तर भाग (उपविभाग-3) 26 3
एकूण 47 8









