बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक जण गणरायाच्या स्वागतामध्ये तल्लीन झाला होता. परंतु, नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी वीज यंत्रणांचे कर्मचारी कार्यरत होते. बुधवारी दिवसभरात अनेक ठिकाणी ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासह वीजवाहिन्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांना वेळेत कनेक्शन देण्यासाठी लाईनमनची धावपळ सुरू होती. नोकरदार, तसेच व्यापारी, विक्रेते सुटी घेऊन गणेशचतुर्थीचा आनंद लुटत होते. घरोघरी गणरायांचे आगमन झाल्याने गणरायाच्या सेवेमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी मेहनत घेतली जात होती.
परंतु, या काळात अनेकजण सेवा देत असल्याचे दिसून आले. दोन मिनिटे जरी वीजपुरवठा खंडित झाला तरी शहरातील गणेशोत्सवामध्ये विघ्न येण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून या काळात हेस्कॉमचे कर्मचारी काम करत असतात. बुधवारी शहरामध्ये दीडशेहून अधिक कर्मचारी, तसेच अधिकारी कार्यरत होते. वीजपुरवठा सुरळीत राहण्यासोबतच सार्वजनिक गणेशमूर्ती सुस्थितीत मंडळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी वीजयंत्रणेची व्यवस्था केली जात होती. त्यातच काही भागात ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने ते देखील दुरुस्त करावे लागले. घरामध्ये गणपती असतानाही आपण लोकांना सेवा दिली नाहीतर मोठे परिणाम होतील, त्यामुळे हेस्कॉमचे कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले. नागरिकांनीही त्यांच्या या कामाचे कौतुक केले.
रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न
शहरात बुधवारी दिवसभर गणेशोत्सवाचा उत्साह होता. परंतु, कुठेही विजेच्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी हेस्कॉमचे कर्मचारी व अधिकारी कार्यरत होते. शहरात अंदाजे दीडशे कर्मचारी कार्यरत होते. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
-अश्विन शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंता)









