प्रतिनिधी/ बेळगाव
मीटर रिडींग करताना विजेचा धक्का बसून तानाजी गल्ली, येळ्ळूर येथील एका युवकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी जैतुनमाळ परिसरात ही घटना घडली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
राहुल भाऊराव पाटील (वय 34) राहणार येळ्ळूर असे त्याचे नाव आहे. तो हेस्कॉमचा कर्मचारी होता. जूनच्या पहिल्या तारखेला मीटर रिडींगचे काम सुरू होते. जैतुनमाळ परिसरातील शेतातील एका विहिरीवर मीटर रिडींगसाठी पोहोचला असता ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात हलविण्यात आला. सायंकाळी उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राहुलच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन बहिणी असा परिवार आहे. सोमवारी 2 जून रोजी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मीटर रिडींग करण्यासाठी मीटर बॉक्समध्ये त्याने आपला हात घातला होता. बॉक्स उघडताना विजेचा स्पर्श होऊन जागेवरच त्याचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 8.30 ते 9 या वेळेत ही घटना घडली आहे. शवागाराबाहेर गावकऱ्यांनी गर्दी केली होती. राहुलच्या आकस्मिक मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत होती. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.









