चौथ्या दिवशीही सर्व्हर नादुरुस्तीचा फटका : कामेच होत नसल्याने नागरिक वैतागले
बेळगाव : हेस्कॉमच्या सर्व्हरची दुरुस्ती सलग चौथ्या दिवशी सुरू राहिल्याने सर्व कामे ठप्प झाली. सर्व्हरच नसल्याने बिल भरण्यापासून नवीन अर्ज करण्यापर्यंत सर्वच सेवा बंद ठेवण्यात आल्या. यामुळे सोमवारी कर्मचारी कार्यालयात असूनही नागरिकांना कार्यालयात येऊन पुन्हा माघारी परतावे लागल्याने नाराजीचा सूर उमटत होता. राज्यातील वीज यंत्रणांसाठी इन्फोसिस या कंपनीकडून सर्व्हर पुरविला जात होता. सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यास अथवा इतर समस्यांसाठी कंपनीची स्पेशल टीम होती. परंतु, याकामी कंपनीचे मागच्या वर्षी कंत्राट संपले आहे. त्यानंतरही नवीन सर्व्हर पुरवठा करणारी कोणतीच कंपनी हेस्कॉमला सेवा देण्यास पुढे न आल्याने इन्फोसिसकडूनच सेवा घेतली जात होती. हेस्कॉमसह मेस्कॉम, जेस्कॉम, बेस्कॉम व इतर विभागांमध्ये मागील वर्षभरापासून सर्व्हर डाऊनच्या समस्या निर्माण होत होत्या.
शुक्रवार दि. 24 ते रविवार दि. 26 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस सर्व्हरमध्ये दुरुस्ती केली जाणार असल्याने सर्व सेवा बंद राहतील, असे हेस्कॉमने कळविले होते. यातील दोन दिवस साप्ताहिक सुटी असल्याने नागरिकांवर याचा फारसा परिणाम जाणवला नाही. सोमवारी सेवा सुरळीत सुरू होणे गरजेचे होते. परंतु, सर्व्हरची दुरुस्ती पूर्ण न झाल्याने सोमवारीदेखील सर्व सेवा ठप्प होत्या. बिल भरण्यासोबतच कार्यालयीन कामकाजही बंद ठेवावे लागले. बिल भरणे, नवीन कनेक्शनसाठी अर्ज करणे, डिपॉझिट भरणे यासह इतर सेवा बंद असल्याने कार्यालयापयर्तिं आलेल्या ग्राहकांना पुन्हा माघारी फिरावे लागले. सोमवार दि. 4 पासून बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे हेस्कॉम कार्यालयातील अनेकांच्या नेमणुका अधिवेशनाच्या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्यास नागरिकांना संबंधित अधिकारी भेटणे अशक्य होणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात दुरुस्तीचे काम पूर्ण करून सेवा पूर्ववत करण्याची मागणी हेस्कॉमच्या ग्राहकांमधून केली जात आहे.
दुरुस्ती पूर्ण न झाल्याने सेवा अद्यापही बंद
शुक्रवारपासून सर्व्हरमधील तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरू असल्याने हेस्कॉमच्या सर्व सेवा ठप्प होत्या. सोमवारपासून सेवा सुरळीत होतील, असे सांगण्यात आले होते. परंतु, दुरुस्ती पूर्ण न झाल्याने सेवा अद्यापही बंद आहेत. तांत्रिक विभागाशी संपर्क साधला असून मंगळवारपासून सेवा सुरू होतील, अशी आशा आहे.
– ए. एम. शिंदे (प्रभारी कार्यकारी अभियंता)









