ऐन खरेदी हंगामात दुरुस्तीकाम : रामदेव गल्लीत प्रवेशबंदीमुळे व्यापारावर परिणाम
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून रामदेव गल्ली परिसरात जुने लोखंडी विद्युतखांब हटवून त्याठिकाणी काँक्रिटचे खांब बसविण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात आले. परंतु, शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त शाळा आणि काही सरकारी आस्थापनांना असलेल्या सुटीमुळे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. परिणामी वीजपुरवठा खंडित व परिसरात प्रवेशबंदी लादल्यामुळे व्यापाऱ्यांमधून प्रचंड नाराजी व्यक्त झाली. विसर्जन मार्गावरील जुन्या व धोकादायक विद्युतवाहिन्या हटविण्याचे निर्देश जिल्हा पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत हेस्कॉमला दिले होते. बैठक होऊन महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप विद्युतवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण झाले नाही. गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर आला तरी हेस्कॉमकडून चालढकल केली जात असल्याने नाराजी व्यक्त होत होती. त्यातच सोमवारी रामदेव गल्लीमध्ये प्रवेशास मज्जाव करण्यात आला. यासाठी गल्लीच्या दोन्ही टोकांवर बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते.
पूर्वसूचना न देता काम सुरू केल्याने नाराजी
कोणतीही पूर्वसूचना न देता रामदेव गल्ली येथे काम सुरू करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. वीजपुरवठा खंडित तर केलाच, त्याचबरोबर रस्तादेखील बंद केल्याने ग्राहक दुकानापर्यंत येणार कसे? असा प्रश्न हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यापारीवर्ग विचारत होता. शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त बऱ्याचशा सरकारी शाळांना सुटी होती. तसेच सोमवार असल्याने शेतकरीवर्ग खरेदीसाठी बाजारात दाखल झाला होता. कुटुंबासमवेत गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली या परिसरात नागरिकांची गर्दी होती. परंतु, हुतात्मा चौक कॉर्नर येथेच बॅरिकेड्स लावून रामदेव गल्लीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला. यामुळे खरेदीसाठी येणारे नागरिक रामदेव गल्लीऐवजी इतरत्र जात होते. याचा फटका व्यापारीवर्गाला बसला.
जुने विद्युतखांब हटवून काँक्रिटच्या खांबांची उभारणी
हेस्कॉमकडून सोमवारी दुपारपासून जुने विद्युतखांब काढून त्याठिकाणी काँक्रिटचे नवे खांब बसविण्यात येत होते. तसेच विद्युतवाहिन्यांचे जाळे कमी करून एबीसी (एरियल बंच केबल) घातल्या जात होत्या. आठवडाभरापूर्वी हे काम केले असते तर व्यापारीवर्गाचे नुकसान झाले नसते, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.









