दोन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभा
बेळगाव : वेळेत वीजबिल न भरल्याने हेस्कॉमकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. काही कारणांनी बिल भरू न शकलेल्या विद्युत ग्राहकांनी शनिवारी झालेल्या तक्रार निवारण बैठकीत बिल भरण्यासाठी वेळ द्या, अशी मागणी केली. हेस्कॉमने बिलाच्या रकमेनुसार दोन ते तीन टप्प्यांमध्ये बिल भरण्याची मुभा दिल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक बेळगाव व खानापूर तालुक्यांमध्ये पार पडली. विजेसंदर्भातील तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या. नेहरूनगर येथे झालेल्या बैठकीमध्ये एम. आय. काद्री, स्वप्नील राजमाने, आर. एस. काकती, डॉ. नाडगौडा यांनी आपल्या तक्रारी मांडल्या. डॉ. नाडगौडा यांच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचे बिल न मिळाल्याबद्दल त्यांनी तक्रार दाखल केली. स्वप्नील राजमाने या ग्राहकाचे विद्युत बिल थकीत होते. त्यांना दोन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची मुभा देण्यात आली. बिल भरल्यानंतरच कनेक्शन देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहर व ग्रामीण उपकेंद्रामध्ये विविध तक्रारी दाखल करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देऊन त्वरित दखल घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, संजीव सुखसारे व इतर उपस्थित होते.









