सराफ शिल्ड क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : द बेळगाव क्रिकेट क्लब आयोजित सराफ शिल्ड 15 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यातून एम. व्ही. हेरवाडकरने लवडेल संघाचा 19 धावांनी तर केएलई इंटरनॅशनलने ठळकवाडीचा 8 गड्यांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. लक्ष्य खतायत, पृथ्वीराज पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 147 धावा केल्या. त्यात लक्ष्य खतायतने 5 चौकारांसह 60, आदित्य जाधवने 5 चौकारांसह 35 तर सुजल इटगीने 3 चौकारांसह 26 धावा केल्या. लवडेलतर्फे सुजल एम. व आयुष यांनी प्रत्येकी 2 तर अथर्वने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लवडेलने 20 षटकात 6 गडी बाद 128 धावा केल्या.
त्यात अजय लमाणीने 1 षटकार 4 चौकारांसह 46, आयुषने 4 चौकारांसह 21, अंशने 17 तर सादने 10 धावा केल्या. हेरवाडकरतर्फे सिद्धांतने 27 धावांत 2, लक्ष्य, सुजल व मंथन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ठळकवाडीने प्रथम फलंदाजी करताना 17 षटकात सर्वगडी बाद 59 धावा केल्या. त्यात ज्ञानेश्वर एम.ने 1 षटकार 1 चौकारासह 17 तर श्री हुंदरेने 15 धावा केल्या. केएलईतर्फे कलश बेनकट्टीने 16 धावांत 3, पृथ्वीराज पाटीलने 6 धावांत 2, अतित भोगणने 12 धावांत 2 तर विख्यातने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलईने 14 षटकात 2 गडी बाद 73 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात स्वयम खोतने 3 चौकारांसह 20, कौस्तुभने 17, युग शहाने 14 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे वेदांत पोटे व संतोष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले. अंतिम सामना सोमवार दि. 27 रोजी एम. व्ही. हेरवाडकर विरुद्ध केएलई इंटरनॅशलन यांच्यात सकाळी 10 वाजता खेळविण्यात येणार आहे.









