इथियोपियातून आलेल्या तेलंगणातील व्यक्तीला अटक
प्रतिनिधी/ बेंगळूर
मागील तीन आठवडय़ांच्या कालावधीत बेंगळूर महसूल गुप्तचर विभागाने बेंगळूरच्या केंपगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 99 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. महिनाभरातील राज्यातील ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.
इथियोपियामधून बेंगळूर विमानतळावर आलेल्या मूळच्या तेलंगणमधील प्रवाशाचे लगेज तपासण्यात आले असता त्यात 14 किलो हेरॉईन आढळून आले. 19 ऑगस्ट रोजी तपासणीवेळी ही कारवाई करण्यात आली असून ही घटना उशिरा उजेडात आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी एका दैनिकाला ही माहिती दिली आहे. इथियोपियन एअरलाईन्समधून आडीस अबाबा येथून बेंगळूरला आलेल्या 45 वर्षीय व्यक्तीच्या हालचालींविषयी विमानतळ अधिकाऱयांना संशय आला. त्याच्याजवळील सुटकेस आणि इतर वस्तूंची तपासणी केल्यानंतर त्यात हेरॉईन आढळून आले. सदर हेरॉईन दिल्ली विमानळावर नेण्याची योजना आरोपीने आखली होती. केंपेगौडा विमानतळावर तिकीट बुकींग करण्याआधीच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱयांनी दिली आहे.
हेरॉईनची बेकायदा वाहतूक करणारा व्यक्ती बेरोजगार असून रोजगाराच्या शोधार्थ इथियोपियाला गेला होता. दिल्लीत अमली पदार्थ विकून पैसे कमावण्याच्या आशेने त्याने हेरॉईन आणले होते. आरोपीविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रोफिक सबस्टेन्स ऍक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.
महिनाभरात बेंगळूरमध्ये 280 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
1 ऑगस्ट रोजी इथियोपियामधून बेकायदेशीरपणे आणण्यात आलेले 112 कोटी रु. किमतीचे हेरॉईन बेंगळूरच्या संगोळ्ळी रायण्णा रेल्वे स्थानकावर जप्त करण्यात आले होते. देशात विदेशातून प्रामुख्याने आफ्रिकेतील देशांमधून अमली पदार्थाची बेकायदा वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरात बेंगळूरमध्ये 280 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून 8 गुन्हे दाखल झाले आहेत.









