अमृतसर-फिरोजपूरमध्ये कारवाई : ड्रोनच्या सहाय्याने पाकिस्तानमधून तस्करी
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबमध्ये सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. अमृतसर सीमेवरील अटारीच्या धानोई कलान गावात बीएसएफने एका शेतातून हेरॉईनचे पॅकेट जप्त केले. या पॅकेटला एक छोटा हुक लावण्यात आल्यामुळे ते सीमेपलीकडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आल्याचे स्पष्ट होते. या पॅकेटमध्ये 530 ग्रॅम हेरॉईन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 3 कोटी 50 लाख रूपये आहे. दुसरीकडे, फिरोजपूर जिह्यातील माछीवाडा भागात बीएसएफला 3 किलो हेरॉईन सापडले आहे. तीन पॅकेटमध्ये पाठवलेल्या या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 21 कोटी रूपये आहे. एकंदर बीएसएफने अमृतसर आणि फिरोजपूरमध्ये 24.50 कोटी रूपयांचे हेरॉईन जप्त केले.
राज्यातील अन्य एका कारवाईत तरनतारनच्या सीमावर्ती गावात विहिरीमध्ये लपवलेले ड्रोन जप्त करण्यात आले आहे. सदर सर्व वस्तू व अमली पदार्थ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात पाकिस्तानी तस्करांनी भारतीय सीमेवर ड्रग्ज पाठविण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असलेल्या तरनतारन जिह्यातील लखना गावात ड्रोन असल्याची माहिती बीएसएफला मिळाली. यानंतर बीएसएफ आणि पंजाब पोलिसांनी या भागात संयुक्त शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमेत शिवारातील एका विहिरीतून तुटलेला ड्रोन आणि काही अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी सदर माल जप्त करत पुढील कारवाई सुरू केली आहे.









