बीएसएफने सीमेवर पाकिस्तानी ड्रोन पाडले
वृत्तसंस्था/ अमृतसर
भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी तस्करांचे ड्रोन पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसले. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) दक्ष जवानांना हे ड्रोन पाडण्यात यश आले आहे. या ड्रोनसोबत हेरॉईनची एक खेपही बांधण्यात आली होती, ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे 21 कोटी ऊपये आहे. ड्रोन पाडल्यानंतर त्याचा शोध घेत जवानांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
अमृतसरनजिक अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरील रत्नाखुर्द गावाजवळ बीएसएफ जवानांना रविवारी रात्री संशयित ड्रोन घुसखोरी करताना दिसले. बीएसएफचे जवान गस्तीवर असताना रात्री 9.45 वाजता ड्रोनचा आवाज आल्यानंतर सैनिकांनी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांनी ड्रोनचा आवाज बंद झाला. त्यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. झडतीदरम्यान बीएसएफ जवानांना अटारी येथील शेतात ड्रोन सापडले. ड्रोनचे तुकडे काही अंतरावर विखुरलेले होते. तसेच त्याठिकाणी जवळच एक पिवळ्या रंगाची पिशवीही सापडली. या पिशवीमध्ये हेरॉईन असल्याचे स्पष्ट झाले असून ते ड्रोनसोबत भारतीय सीमेवर पाठवण्यात आले होते.
जवानांनी हेरॉईनची बॅग ताब्यात घेऊन सुरक्षा तपासणी सुरू केली. त्याचे एकूण वजन 3.2 किलो होते. ड्रोन आणि हेरॉईनचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसात बीएसएफने केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. तसेच चालू महिन्यात जवानांनी पाडलेले हे पहिले ड्रोन आहे.