बीएसएफकडून पाकिस्तानी ड्रोन नष्ट
वृत्तसंस्था/ तरनतारन
पंजाब पोलिसांच्या मदतीने बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानी तस्करांचा आणखी एक प्रयत्न उधळून लावला आहे. जवानांनी सोमवारी सकाळी एक ड्रोन जप्त केला आहे. या ड्रोनला जोडण्यात आलेले 21 कोटी रुपयांचे हेरॉइन हस्तगत करण्यात आले आहे. बीएसएफ अन् पंजाब पोलिसांना हे यश तरनतारन येथील खेमकरन सेक्टरमध्ये मिळाले आहे.
सोमवारी सकाळी संबंधित भागात ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या होत्या. यानंतर बीएसएफ जवानांनी पंजाब पोलिसांशी संपर्क साधला होता. दोघांच्या पथकांनी या भागत शोधमोहीम हाती घेतली. जवानांना यादरम्यान सीमावर्ती भागात एक हॅक्साकॉप्टर ड्रोन आढळून आला. या ड्रोनसोबत एक पिवळे पाकिट होते, ज्यात हेरॉइन खेप बांधलेली होती. यात एकूण 3 पाकिटे होती, ज्यात 3 किलोग्रॅम वजनाचे अमली पदार्थ होते. हा हॅक्साकॉप्टर ड्रोन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असून त्यावर 6 प्रोपॅलर तसेच डबल बॅटरी लावण्यात आली होती.
बीएसफने जुलै महिन्यात एकूण 5 ड्रोन जप्त केले आहेत. तर 9.5 किलोग्रॅम हेरॉइनची खेप जप्त करण्यास यश मिळविले आहे.









