डिसेंबर तिमाहीचा निकाल घोषित : 10,210 कोटीचा मिळवला महसूल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिरो मोटोकॉर्प यांनी डिसेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 12 टक्के वाढ नोंदवली आहे. हिरो मोटोकॉर्पने 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये 1203 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. तर 10 हजार 210 कोटी रुपयांचा महसुल याच अवधीत कंपनीने मिळवला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या कालावधीत कंपनीचा नफा 1203 कोटी रुपयांवर राहिला होता. मागच्या वर्षी समान तिसऱ्या तिमाहीमध्ये 1073 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता.
महसूल वाढीत सातत्यता
याच दरम्यान कंपनीने तिसऱ्या तिमाहीमध्ये 5टक्के वाढीसह 10,210 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीने 9723 कोटी रुपये प्राप्त केले होते. महत्त्वाचे म्हणजे कंपनीने सलग तिसऱ्या तिमाहीत आपल्या महसुलामध्ये 10 हजार कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार करण्याचा विक्रम केला आहे.
14 लाख दुचाकींची विक्री
सदरच्या अवधीमध्ये कंपनीने 14.64 लाख मोटरसायकल आणि स्कूटरची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीत 14.6 लाख दुचाकींची विक्री करण्यात आली होती. आर्थिक वर्षामध्ये 31 डिसेंबरपर्यंतच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये 3529 कोटी रुपयांनी नफा वाढला होता. महसूल देखील 10 टक्के वाढत 30818 कोटी रुपयांवर पोहोचला.









