विदाची किंमत 1.4 लाख पासून सुरू ः एक चार्जिंगवर 165 किमी धावणार
वृत्तसंस्था/ मुंबई
हिरो मोटोकॉर्पने शुक्रवारी आपली ईवी ब्रँड विदा याच्या अंतर्गत आपली स्वतःची पहिलीवहिली इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. ती विदा व्ही1 प्रो आणि व्ही1 प्लस दोन मॉडेलमध्ये बाजारात सादर करण्यात आली आहे.
यामध्ये व्ही1 प्लसची एक्स शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आणि प्रोची किंमत 1.59 लाख रुपये इतकी राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ग्राहकांना आगाउ बुकिंगकरीता ही गाडी 10 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एका चार्जवर 165 किलोमीटर धावणार
व्ही1 प्रो आणि व्ही1 प्लस या दोन्ही मॉडेलचा वेग हा 80 किमी प्रतितास इतका असणार आहे. एका चार्जवर जवळपास ही गाडी 165 किलोमीटरचे मायलेज देऊ शकणार आहे. फास्ट फास्टिंग 1.2 किमी/मिनिट राहणार आहे. व्ही 1 प्रो 0-40 किलोमीटर 3.2 सेकंदमध्ये आणि प्लस 3.4 सेकंदमध्ये वेग घेणार आहे.
दोन्हीमध्ये 7 इंच टच क्रीन
अनेक मल्टीपल राइडिंग मोड मिळणार असून ईको, राइड तसेच स्पोर्ट यांचा यात समावेश असेल. दोन्ही गाडय़ांमध्ये 7 इंचाचा टचक्रीन दिला आहे. सोबत कीलेस नियंत्रण आणि एसओएस अलर्ट सारखी फीचर्स दिली आहेत. हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक वाहने आगामी काळातही सादर करणार असून ती विदा या नावाअंतर्गत सादर होणार आहेत.
कंपनी खरंतर या गाडय़ा आधीच लाँच करणार होती. पण योग्य ते सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच गाडी लाँच करण्याचे ठरले. त्याप्रमाणे गाडी शुक्रवारी लाँच केली आहे. सुरूवातीला ही गाडी नवी दिल्ली, जयपूर व बेंगळूर येथे उपलब्ध केली जाणार असून इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी मात्र डिसेंबरच्या दुसऱया आठवडय़ापासून केली जाणार असल्याचे चेअरमन पवन मुंजाल यांनी सांगितले आहे. नवी गाडी आगामी काळात ओला एस 1 प्रो, ऍथर 450 एक्स जन 3, बजाज चेतक आणि टीव्हीएस आयक्युब यांना टक्कर देणार आहे.









