जून तिमाहीतील कामगिरी : नफ्यात 36 टक्के वाढ
बेंगळूर :
देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पच्या नफ्यामध्ये 36 टक्के इतकी वाढ जून तिमाहीमध्ये दिसून आली आहे. कंपनीने 10 हजार कोटी रुपयांचा महसुल प्राप्त करण्यामध्ये यश मिळविले आहे. मोटारसायकल विक्रीमध्ये झालेली वाढ यामुळे नफ्यामध्ये चांगली वाढ दिसून आली आहे.
एप्रिल ते जून 2024 या कालावधीत कंपनीने 1122 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. प्रिमीयम गटातील वाहनांच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचेही पहायला मिळाले आहे. मागच्यावर्षी याच अवधीत कंपनीने 824 कोटी रुपयांचा नफा कमविला होता. याच दरम्यान कंपनीने 15 टक्के वाढीसह 10 हजार 143 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे. कंपनीने तिमाहीमध्ये पहिल्यांदाच 10 हजार कोटीपेक्षा अधिक महसुल प्राप्त करण्यात यश मिळविले आहे.
सदरच्या तिमाहीत 14 टक्के खर्चामध्ये वाढ झाली आहे. यायोगे कंपनीचा एकूण खर्च 8 हजार 881 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या तिमाहीत 15.35 लाख इतक्या दुचाकींची विक्री करण्यात आली आहे. मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत दुचाकी विक्रीत 13 टक्के वाढ दिसते आहे. देशांतर्गत बाजारात दुचाकी विक्रीला चांगला प्रतिसाद मिळण्यासोबतच इलेक्ट्रीक वाहनांकरिताही मागणी चांगली राहिली आहे.