999 पायऱ्या चढून जात लोक पाहतात अद्भूत दृश्य
तियानमेन माउंटेन चीनच्या झांगजियाजीच्या तियानमेन माउंटेन नॅशनल पार्कच्या आतील एक पर्वत असून याला ‘हेवन्स गेट माउंटेन’ म्हणजेच ‘स्वर्ग द्वार पर्वत’ही म्हटले जाते. यात एक ‘दिव्य’ प्रवेशद्वार असून तेथपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना 999 पायऱ्या चढून जावे लागते आणि मगचअद्भूत दृश्य पाहता येते.
पर्यटक केबल कारची सेवा प्राप्त करत तेथे पोहोचू शकतात. रस्ते आणि ग्लास स्कायवॉक्स द्वारेही तेथे पोहोचता येते. येथे येणारे लोक बहुतांशवेळा झांगजियाजीच्या सेंटरवरून तियानमेन माउंटेन केबलवेमध्ये स्वार होत पुढील अर्ध्या तासात 4 हजार फुटांपेक्षा अधिक उंचीवर तियानमेन माउंटेनच्या शिखरावर पोहोचतात. प्रवासाच्या अखेरीस पर्यटकांना ‘स्वर्गाच्या प्रवेशद्वारा’वर पाऊल ठेवता येते.
समुद्रसपाटीपासून 5 हजार फुटांच्या उंचीवर तियानमेन गुहा देखील असून ती जगातील सर्वात उंच नैसर्गिक स्वरुपात निर्मित गुहा आहे. येथील अद्भूत दृश्य आणि अद्वितीय संरचना पाहण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येत असतात. या मोहक स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांना ‘स्वर्गाच्या जिन्या’वरील 999 पायऱ्या चढून यावे लागते. चिनी अंकशास्त्रात 9 हा भाग्यशाली आकडा आहे. 9 या आकड्याला सौभाग्य आणि अनंत काळाचे प्रतीक मानले जाते. जे लोक केबलकारचा प्रवास टाळू पाहतात, त्यांना एका लहान रस्त्याचा पर्याय निवडता येतो, या रस्त्यात एकूण 99 वळणे असून तो अत्यंत धोकादायक मानला जातो.
येथील गुहा सुमारे 430 फूट उंच आणि 190 फूट रुंद आहे. 263 सालापर्यंत ही एक अत्यंत सामान्य गुहा होती, परंतु पर्वताच्या एका बाजूकडील खडक कोसळल्यावर ‘स्वर्गाचे द्वार’ निर्माण झाले. परंतु काही लोकांनुसार गुहेची निर्मिती एक रहस्य असून तियानमेनला एका पवित्र पर्वताच्या स्वरुपात स्थापित करण्याच्या मान्यतेला मजबुती देते. येथे तियानमेनशान मंदिर असून ते 870 व्या साली तयार करण्यात आले होते. हे हुनानमधील बौद्ध केंद्र असल्याचा दावा करण्यात येतो.









