फारुख अब्दुल्लांचे देशवासीयांना आवाहन
वृत्तसंस्था/ पहलगाम
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पर्यटकांना काश्मीर खोऱ्यात येण्याचे आवाहन केले आहे. पहलगाम येथे गोल्फचा आनंद घेतल्यावर अब्दुल्लांनी अमरनाथ यात्रेचा उल्लेख करत येथे भोलेनाथ तुमची प्रतीक्षा करत आहेत, असे उद्गार काढले आहेत.
पर्यटनावरच केवळ निर्भर राहिले जाऊ नये. हे राज्य पुढे न्यायचे असेल तर आम्हाला शाश्वत उद्योगाकडे वळावे लागेल. पर्यटन उद्योगात अडचण म्हणजे येथे एक गोळी झाडली गेली तर लोक येणे थांबवितात. स्थानिक लोकांनी बँकेतून कर्ज घेत हॉटेल्सची दुरुस्ती केली, टॅक्सीचालकांनी टॅक्सी खरेदी केल्या आहेत. प्रत्येकाने पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, असे फारुख अब्दुल्लांनी म्हटले आहे. यंदा कोट्यावधींच्या संख्येत लोक येतील अशी अपेक्षा होती. परंतु दहशतवाद्यांना हे पाहवलं नाही. त्यांनी पर्यटकांची कत्तल केली. या दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचाही विचार केला नाही, असे त्यांनी नमूद केले.
अधिकाधिक लोकांनी यावे
पहलगाम येथे जे घडले त्याबद्दल पूर्ण दु:ख आहे, परंतु हा हल्ला आम्ही केला नाही. देशवासीयांनी येथे परत यावे असे मी आवाहन करतोय, आम्ही तुमची प्रतीक्षा करत आहोत, आम्हीच नव्हे तर भोलनाथ तुमची प्रतीक्षा करत आहेत. अमरनाथ यात्रेत अधिकाधिक लोकांनी यावे, या लोकांनी येथून परत गेल्यावर काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन इतरांसमोर करावे असे उद्गार अब्दुल्ला यांनी काढले आहेत.









