पलूस :
येथील जुना वाळवा वाट परिसरात असणाऱ्या महेश पांडूरंग महाजन यांच्या शेतातील सुमारे ५० गुंठे क्षेत्रातील मिरची पिकांवर अज्ञाताने तण नाशक फवारणी करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. हा प्रकार शनिवारी रात्री घडला आहे. अवघ्या दोन दिवसात मिरचीचा पहिला तोडा घेणार होते. कष्टाने घेतलेल्या पिकांवर तणनाशक फवारणी केल्याने महाजन यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.
महेश महाजन व त्यांची आई दोघांनी मिळून शेतात २४ जानेवारी रोजी ५५३१ जातीच्या मिरचीची लागण केली. ऐकीकडे उन्हाचे तापमान वाढत असताना देखील वेळोवेळी पाणी, तसेच विविध औषधाचे डोस दिल्याने अत्यंत चांगल्या पध्दीतने पीक आले होते. फुलकळीने मिरचीची झाडले बहरली होती. दोन दिवसात पहिला तोडा घेणार होते. यामध्ये त्यांना सुमारे पाचशे किलो मिरची मिळणार होती. त्यानंर आठवड्यात अधिक प्रमाणात मिरचीचे पीक मिळणार होते. महाजन यांच्या शेताच्या बाजूला बस्ती नाही. तसेच एका बाजूस ऊस शेती, दुसऱ्या बाजूला द्राक्ष बाग, अन्य बाजूला शाळूचे पीक आहे. रस्त्याच्या आतील बाजूस शेती असल्याने रात्री इकडे कोणीही फिरकत नाही. शनिवारी दिवसभरात शेतातील कामे उरकून महेश घरी गेले. रविवारी सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना मिरचीच्या सर्व पिकांवर तणनाशक फवारल्याचे लक्षात आले.
गेल्या दोन महिन्यापासून कष्टाने फुलवलेल्या मिरची पिकांची अवस्था पाहून महाजन यांच्या डोळ्यात अश्रू उभा राहिले. हाता तोंडाला आलेल्या पिकांवर तणनाशक मारून त्याला काय मिळाले, असा सवाल तेथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नगरसेवक निलेश येसुगडे, कपील गायकवाड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून महाजन कुटुंबियांना आधार दिला. तसेच तलाठी, सर्कल यांना संपर्क करून पंचनामा करण्यास सांगिलते. याबाबत महाजन यांनी पलूस पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद देणार आहेत.








