झारखंडमध्ये ठरावाच्या बाजूने 81 पैकी 48 मते ः भाजपचा सभात्याग
रांची / वृत्तसंस्था
झारखंड विधानसभेत हेमंत सोरेन सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 81 सदस्यीय विधानसभेत सरकारच्या बाजूने 48 मते पडली. विश्वासदर्शक ठरावाच्या भाषणाच्या वेळी काही आमदारांनी सभागृहात आंदोलन केले. तर, भाजपने सभात्याग केला. विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. यानंतर सोरेन यांनी ‘जिते हैं हम शान से…’ असे ट्विट केले आहे. तसेच भाजपने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या पंधरवडय़ापासून झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींना सोमवारी अर्धविराम मिळाला. आमदारांच्या फोडाफोडीच्या प्रकारामुळे हेमंत सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागले. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना गेले काही दिवस सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले होते. छत्तीसगडहून परतलेल्या सर्व आमदारांना सोरेन यांनीच सोमवारी सकाळी बसने विधानसभेत आणले होते. यादरम्यान भाजप आमदारांनी विधानसभेसमोर निदर्शने केली. सोरेन यांच्या आमदारांचे छत्तीसगडला जाणे आणि दुमका हत्याकांडाचा मुद्दा भाजप आमदार उपस्थित करत होते.
झारखंड विधानसभेत आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला. हेमंत सोरेन यांच्याबाजूने 48 मते पडली. तर, विरोधात एकही मत पडले नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असल्याचे जाहीर केले. विश्वासदर्शक ठरावावेळी बोलताना मुख्यमंत्री सोरेन यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. विरोधकांनी लोकशाही नष्ट केली असून भाजपने आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही विधानसभेत आमची ताकद दाखवणार असल्याचे त्यांनी म्हटले. विधानसभेचे हे अधिवेशन लोकशाही वाचवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. सर्वसामान्य जनता भाजीपाला, रेशन, कपडे यासारख्या वस्तू खरेदी करतात. मात्र, भाजपाकडून आमदारच खरेदी केले जात असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
‘विश्वासदर्शक’ नाटक कशाला? ः भाजप
भाजपकडून बोलताना नीलकंठ मुंडा यांनी झारखंडचे नागरिक घाबरले आहेत. विरोधकांनी, न्यायालयाने अथवा राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव सिद्ध करण्यास सांगितले नाही. तरीदेखील सरकार का घाबरले असा सवाल त्यांनी केला. विश्वासदर्शक ठराव अशा पद्धतीने आणणे म्हणजे सरकारला आपल्याच आमदारांवर विश्वास नाही, असे दिसत आहे.
स्वतःच्या आमदारांना कैद्यांप्रमाणे वागणूक ः मरांडी
भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते बाबूलाल मरांडी यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन नियमांचे उल्लंघन करून बोलावण्यात आल्याचे विधानसभेबाहेर स्पष्ट केले. सत्ताधारी पक्ष आपल्या आमदारांना सध्या कैद्यांप्रमाणे वागवत असल्याचेही ते म्हणाले. रायपूरमध्ये आमदारांना कडेकोट बंदोबस्तात कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आले होते. तेथून परत आल्यानंतरही सर्किट हाऊसमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. हेमंत सोरेन हे आपल्या आमदारांवर विश्वास नसल्यासारखे वागत असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या वादाच्या भोवऱयात अडकले आहेत. एका खाणीचा पट्टा स्वतः मुख्यमंत्री असताना स्वतःच्या नावावर केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. राज्यपालांनी त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, राज्यपालांनी निवडणूक लढवण्याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही. अशा परिस्थितीत सरकारवरील संकट टाळण्यासाठी सोरेन यांनी आपल्या समर्थनात असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसच्या आमदारांना छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे गेले काही दिवस ठेवले होते.









