शिंदे गटाच्या विद्यमान खासदाराला धक्का
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पालघर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने हेमंत विष्णू सावरा यांना तिकीट दिले आहे. पालघरच्या जागेचा मुद्दा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील उमेदवारांच्या निवडीमध्ये अडकला होता. अखेर ही जागा आपल्या कोट्यात आणण्यात भाजपला यश आले. पालघरमधून राजेंद्र गावित हे शिंदे गटातील नेते विद्यमान खासदार आहेत. मात्र, या जागेवरून हेमंत सावरा यांना तिकीट द्यावे, असा आग्रह भाजपकडून होत असल्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. आता या जागेवर हेमंत सावरा यांना शिवसेना-उद्धव ठाकरे गटातील भारती कामडी यांच्याशी लढत द्यावी लागेल. सावरा यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना धक्का बसला आहे.









