काकती येथे हिंडाल्को इंडस्ट्रीज कंपनीच्यावतीने ‘शेतकरी प्रशिक्षण आणि क्षेत्र भेटी’वर कार्यशाळा
वार्ताहर/काकती
जमिनीचे आरोग्य व मानवी आरोग्य जपणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि शेती फायदेशीर करणे हे केवळ सेंद्रीय शेतीतून करू शकतो. सेंद्रीय शेती केल्याने उत्पादन कमी होते हा समज शेतकरी बांधवांनी काढून टाकावा. आजच्या रासायनिक शेतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे वाढता खर्च. सेंद्रीय शेतीचा अवलंब करून रासायनिक खते आणि कीटकनाशक, रोगराईवरील खर्च शून्यावर आणता येतो. आजपासूनच तुम्ही घरच्या उपलब्ध असलेल्या वस्तू घेऊन बायोकल्चर तयार करून शेती करा, असे आवाहन कोल्हापूरचे निवृत्त कृषी अधिकारी तानाजीराव घाटगे यांनी केले.
हिंडाल्को इंडस्ट्रीज कंपनीच्यावतीने ‘शेतकरी प्रशिक्षण आणि क्षेत्र भेटी’ ही कार्यशाळा येथील सिद्धेश्वर मंदिर मंगल कार्यालय सभागृहात बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडली. अध्यक्षस्थानी हिंडाल्को इंडस्ट्रीजचे जनसंपर्क अधिकारी दिनेश नाईक होते. व्यासपीठावर देवस्थान पंचमंडळाचे अध्यक्ष शिवाजी नरेगवी, भावकाण्णा टुमरी, नारायण होळी, दयानंद लोहार, रयत केंद्राचे अधिकारी अरुण कापशी उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत आणि प्रस्तावना लक्ष्मण पाटील यांनी केले. मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. कृषी तज्ञ घाटगे पुढे म्हणाले, निसर्गाने अगोदरच व्यवस्था करून ठेवली आहे. कोणतेही पोटॅश, पालाश व सुक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना द्यावी लागणार नाहीत. आणि युरियाही द्यावे लागणार नाही. शेणखत, पालापाचोळा, गांडूळमधूनच मिळते. हवेतच 78 टक्के नत्र असतो. वीज चमकली की 15 ते 20 किलो नत्र प्रति हेक्टर जमा होते. पावसातून नत्र मिळते.
उसासारख्या पिकालासुद्धा कोणताही खर्च न करता वर्षाचे 60 टन तर आडसाली हंगामातील ऊस किमान 100 ते 80 टन उत्पादन शेतकरी घेत आहेत. 9 महिन्यांपर्यंत उसाचे पहिले पान हिरवं पाहिजे. 2 कांडे वाढ झालेला ऊस असला तरी तो खाऊ शकतो. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, सगळ्याचा नाश होतो. वाळवी 7 दिवसात जाते. हुमणी महिन्यात नाहीशी होते. तांबेरा मावा असे कोणतेच रोग राहणार नाहीत, असे भात, ऊस, कपाशी, सोयाबीन, काकडी पिकांचे प्रात्यक्षिक अनुभव सांगितले. सिद्धेश्वर प्रोड्युस फार्मर्सचे अध्यक्ष गोपीचंद नरेगवी हे आपल्या शेतात बायोकल्चर तयार करीत असल्याचे सांगितले. रासायनिक शेतीमध्ये केवळ पिकाला रासायनिक खतांद्वारे अन्न दिले जाते. जमिनीच्या सुपीकतेकडे दुर्लक्ष होते. तर सेंद्रीय शेतीत नैसर्गिक खत जमिनीला मिळते. आणि जमीन पिकाचे पोषण करते. विषमुक्त अन्न देणारी सेंद्रिय शेतीच शाश्वत फायदेशीर आहे. याच मार्गाने निश्चित शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले, असा दृढ विश्वास व्यक्त केला. यावेळी प्रगतीशील शेतकरी भावकाण्णा मुंगारी, श्रीपाद देसाई, बसवाणी निलजकर, नाना टुमरी यासह काकती, गौडवाड, होनगा येथील शेतकरी उपस्थित होते.
जैव पद्धतीने बायोकल्चर तयार करण्याची पद्धत
5 किलो बीन पॉलीश तांदुळ नेहमीपेक्षा 12 इंच पाणी ठेवून साधारण शिजवून पाणी करणे. 50 लिटर केनात ओतणे. त्यात उकळून गार केलेले 40 लिटर पाणी मिसळणे. साधारणत: 50 लिटरच्या या मिश्रणात 200 मिली बायोकल्चर ओतायचे. 48 तासानंतर ते थंड होते. पिकांना फवारायचे. एक एकरसाठी 2 लिटर कल्चर 200 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. अथवा ठिबकमधून पिकात सोडावे.









