जीवनावश्यक वस्तूंचे वितरण : यापुढेही सहकार्य करण्याची ग्वाही : उपक्रमाचे कौतुक
प्रतिनिधी /निपाणी
सहकार क्षेत्रात नावाजलेल्या लोकमान्य को-ऑप. पेडिट सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली गेल्यावषी लोककल्प फाऊंडेशनची सुरुवात करण्यात आली. या फाऊंडेशनच्यावतीने अनेक विधायक उपक्रम राबविले जात आहेत. निपाणीतील बसवगोपाळ अनाथाश्रमातील आपद्बांधव मुलांची स्थिती पाहिल्यानंतर त्यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोमवारी या मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून त्यांची भूक शमविण्याचे विधायक कार्य फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले.
प्रारंभी लोकमान्यच्या निपाणी शाखेचे कर्मचारी दत्तात्रय माने यांनी स्वागत केले. अनाथाश्रमाचे प्रमुख राजगौडा गौराई म्हणाले, 2008 मध्ये या अनाथ आश्रमाची सुरुवात केली. त्यावेळी याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन वेगळा होता. मात्र अनेक अडचणी झेलत येथील आपद्बांधव मुलांना आधार दिला आहे. आजतागायत येथील अनेक मुले उच्चशिक्षित झाली आहेत. अजूनमधून विविध संघ-संस्थांचे व नागरिकांचे सहकार्य मिळत असून या साहित्याचा सदुपयोग केला जात आहे, असे सांगितले.
यावेळी फाउंडेशनच्यावतीने अनाथाश्रमात 300 किलो तांदूळ, 300 किलो पीठ, 50 पॅकेट चहा पावडर, 50 पॅकेट कॉफी पावडर, 50 पॅकेट दूध पावडर, 200 किलो साखर, 200 किलो मीठ, 50 किलो डाळ, बिस्कीट, चॅकलेट यासह विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.









