शहरातून मदत फेरीतून 31 हजार रुपये जमा; आपत्ती व्यवस्थाप संस्थांचा पुढाकार; जमा रक्कम पत्नीच्या बँक खात्यावर जमा; आबेगाव (जि. बीड) येथील ग्रामस्थ प्रमोद शेजूळ यांच्याकडून 42 हजार रोख मदत
कोल्हापूर प्रतिनिधी
माजलगाव (जि. बीड) येथील धरणात बुडालेल्या डॉक्टरांचा शोध घेताना बुडून मृत्यु झालेल्या आपदा मित्र दिवंगत राजशेखर मोरे यांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले आहेत. सोमवारी शहरातून मदतफेरी काढून मदत गोळा करण्यात आली. यावेळी दानशूर व्यक्ती, नागरिक, व्यापारी यांनी सढळ हाताने मदत केली. यामध्ये सुमारे 31 हजार 856 रुपये जमा झाले. ही रक्कम राजशेखर मोरे यांच्या पत्नी उषा यांच्या बँक खात्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून भरण्यात आली.
आपदा मित्र दिवंगत राजशेखर मोरे यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जीवरक्षक संस्था, जीवन आधार संस्था, जीवन ज्योत संस्था, वझीर रेस्क्यु फोर्स, पास रेस्क्यु फोर्स, आधार संस्था, पोलीस सेवा संघटना, पोलीस बॉईज संघटना यांनी पुढाकार घेत शहरातून मदतफेरी काढली.
दसरा चौक येथून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मदतनिधी बॉक्समध्ये पैसे टाकून मदतफेरीची सुरुवात करण्यात आली. मदतफेरीसाठी चित्ररथ तयार करण्यात आला होता. यावर राजशेखर यांनी आपत्ती व्यवस्थापनमध्ये केलेल्या कामाची छायाचित्रे फलकाद्वारे लावण्यात आली होती.
ही मदतफेरी फोर्ड कॉर्नर,लक्ष्मीपुरी, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, अयोध्या टॉकीज परिसरमार्गे दसरा चौक येथे येऊन या फेरीचा समारोप झाला. मदतफेरी मार्गावर दानशूर व्यक्ती, नागरिक, व्यापार्यांनी सढळ हाताने मदत केली. यामध्ये सुमारे 31 हजार 856 रुपये इतकी मदत गोळा झाली. ही रक्कम जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दिवंगत राजशेखर यांच्या पत्नी उषा यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली.
“या फेरीमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, काँग्रेसचे माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, जाफरबाबा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्यासह विविध पक्ष, संस्था,संघटनांचे पदाधिकारी व विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांचे आपदा मित्र सहभागी झाले होते.
आबेगाव ग्रामस्थांकडून 42 हजारांची रोख मदत
आबेगाव (ता. माजलगाव, जि. बीड) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद शेजूळ यांच्या पुढाकाराने गावात राजशेखर यांच्या कुटूंबियांसाठी मदतफेरी काढण्यात आली. यामध्ये जमा 42 हजार रुपये जमा झाले. ही रोख रक्कम प्रमोद शेजूळ यांनी सोमवारी कोल्हापूरात येऊन मोरे कुटूंबियांकडे सुपुर्द केली.
जिल्हा प्रशासनाकडून दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन
दानशुरांनी मोरे यांच्या कुटूंबियांच्या मदतीसाठी पुढे यावे. ज्यांना मदत द्यायची आहे त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या, खरी कॉर्नर, शाखा खाते क्र. 60382060738, IFS code- MAHB0000326, Mirc code- 416014005 किंवा 9767134996 या फ़ोन पे / गुगल पे क्रमांकावर ऑनलाईन करावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.