डॉ. अंजली फाऊंडेशनकडून आर्थिक मदतीचा हातभार : स्थलांतरासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार
खानापूर : आमगाव येथील हर्षदा घाडी या महिलेला चार दिवसापूर्वी मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिला तिरडीवरुन उपचारासाठी बेळगावला दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती डॉ. अंजली निंबाळकर यांना मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आमगाव येथे जाऊन ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यास सांगितली होती. तसेच कुटुंबीयांना आर्थिक मदत देवू केली. आणि आमगाव वासियांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच स्थलांतरासाठी सरकारदरबारी प्रयत्न करून शक्य तेवढ्या लवकर आमगाववासियांचे प्रश्न सोडवण्यात येतील, असे डॉ. अंजली निंबाळकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या अतिशय दुर्गम तसेच वाहतुकीची कोणतीही सुविधा नसलेले गाव म्हणून परिचित असलेले आणि सर्वात जास्त पाऊस होणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आमगाव गावी चार दिवसापूर्वी एका महिलेला वैद्यकीय उपचारासाठी तिरडीवरुन चार कि. मी. आणण्यात आले हेते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांशी चर्चा केली असून आमगाव वासियांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात तातडीने क्रम घेण्यात यावा, अशी मागणी अंजली निंबाळकर यांनी केली आहे. तसेच गावकऱ्यांच्या मागणीनुसार स्थलांतर करण्यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. निंबाळकर यांनी सांगितले.
डॉ. अंजली निंबाळकर पुढे म्हणाल्या, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरदेखील आमगाव वासियांचे जीणे अत्यंत हलाखीचे झाले आहे. वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे या दुर्गम गावाचा विकास होऊ शकणार नाही. यासाठी गावकऱ्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्यांनी समाजजीवनाच्या प्रवाहात येणे गरजेचे आहे. त्यांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क असल्याने त्यांनी स्थलांतरीत होण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असून मी स्वत: मुख्यमंत्र्यांसह संब्ंाधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून येत्या काही महिन्यातच आमगावच्या स्थलांतरासाठी प्रयत्न करणार आहे.गावकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी हर्षदा घाडी यांच्या कुटुंबीयांना अंजली फाऊंडेशनकडून आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोळी, सुरेश जाधव, अॅड. ईश्वर घाडी, दीपक कवठणकर, नागेश पाटील, गणेश कुलम, साईस सुतार, ऋतिक कुंभारसह फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









