महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांचे जनतेला आवाहन : घंटागाडी असूनही कचरा फेकला जातोय चौकात
बेळगाव : महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी हे कचरामुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शहरातील असलेले ब्लॅकस्पॉट दूर करण्यात आले आहेत. 244 ब्लॅकस्पॉटमधील 178 ब्लॅकस्पॉट दूर झाले आहेत. आणखी काही ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत, तेही दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, त्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे, असे आवाहन अशोक दुडगुंटी यांनी केले आहे. शहरातील विविध चौकांमध्ये कचरा टाकला जायचा. त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग तसेच पडून रहायचे. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबरच मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर देखील वाढत चालला होता. हे ब्लॅकस्पॉट निर्मूलनासाठी शहरातून दोन वेळा घंटागाडीच्या साहाय्याने कचरा गोळा केला जात आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. तरीदेखील अनेक जण कोणत्याही चौकामध्येच कचरा फेकून जात आहेत. असेच सुरू राहिले तर ब्लॅकस्पॉट निर्मूलन करणे अवघड होणार आहे. तेव्हा जनतेनेही यासाठी सहकार्य केले पाहिजे.
कचरा न फेकण्याचे आवाहन
शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच गल्ल्यांमधून दोन वेळा कचरा गोळा केला जातो. तेव्हा घंटागाडी आल्यानंतर त्यांच्याकडे तो कचरा द्यावा. व्यावसायिक असो वा सामान्य नागरिक, त्यांनी काळजी घेतली तरच ब्लॅकस्पॉट पूर्णपणे दूर होणार आहेत. शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात सध्या कचऱ्याची समस्या दूर झाली आहे. मात्र, अजूनही काही ठिकाणी कचरा फेकण्यात येत आहे. तो कचरा कोणीही फेकू नये, जेणेकरून कचरा साचणार नाही, हे बेळगावकरांनी ध्यानात घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा
कचऱ्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरते. डासांचा प्रादुर्भाव देखील वाढतो. कुत्र्यांचा आणि मोकाट जनावरांचादेखील वावर वाढत आहे. परिणामी भटकी कुत्री अचानकपणे हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. आपल्या चुकीमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा याचा कुठेतरी साऱ्यांनीच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. आम्ही आता बरेच ब्लॅकस्पॉट दूर केले आहेत. त्यासाठी स्वतंत्र पथकही आहेत. त्यांनाही प्रत्येकाने सहकार्य करावे. नगरसेवक, जनतेनेही पुढे येऊन ब्लॅकस्पॉट दूर करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.









