मालवण-माळगांव येथील होतकरू दशावतारी कलाकार विराज माळगांवकर दुर्दैवी व्यथा असताना शासनाच्या घरकुल योजनेसाठी प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत करूनही गेली ३ वर्षे ते प्रकरण मंजूर झालेले नाही. त्यामुळे मिडीयाने दानशूर व्यक्तींना मदत करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनानुसार सामाजिक, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त कला क्रिडा मंडळाने सदर युवकाची भेट घेतली असता त्याने सुचित केल्यानुसार घराच्या बांधकामास लागणारी 3 ब्रास वाळू व सिमेंट पोत्यांसाठी आर्थिक मदत प्रदान करीत आपल्या मंडळातर्फे खारीचा वाटा उचलला आहे.
मालवण-माळगांव (मधलीवाडी) येथील वयोवृध्द वडीलांना औषधोपचारसह दररोजचा सर्व प्रकारचा खर्च करताना दशावतार कलावंत कु. विराज भिवा माळगांवकर याला नाकीनव येतात. असे असताना अनेक वर्षाचे मातीच्या भिंतीचे, ज्या भिंती केव्हाही कोसळतील अशा अवस्थेत आहेत. त्यामुळे आपण आपल्या वडीलांना चांगल्या घरात कधी ठेवणार ? आपले स्वत:चे छोटे पण मजबुत घर कधी होईल हि चिंता त्याला होती. कारण कलेवर नितांत प्रेम करणारा हा कलाकार दशावतारी कला व हंगामात गणेश मुर्त्या बनवून यातून येणाऱ्या पैशातून तो आपले कुटुंब कसेबसे चालवितो.
ही माहिती मिळताच सामाजिक भान व माणूसकी जपून वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या परीने मदत कार्य करत असल्याने जिल्ह्यात वेंगुर्ले राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक, कला क्रिडा मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे . या मंडळाचे पदाधिकारी अजित राऊळ, हर्षद रेडकर, ज्ञानेश्वर रेडकर, अमित भोगले, बापू वेंगुर्लेकर यांनी मालवण-माळगांव (मधलीवाडी) येथे स्वत: जाऊन विराज माळगांवकर यांस आपल्यापरीने मदत केली. यावेळी माळगांव उपसरपंच शशिकांत सरनाईक उपस्थित होते.









