खासगी वाहतूकदारांशी पोलीस अधिकाऱ्यांनी साधला संवाद
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवार दि. 5 ऑगस्टपासून परिवहन कर्मचारी संपावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी बेळगाव पोलिसांनी खासगी वाहनमालक व चालक, ऑटोरिक्षा चालकांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मार्केट पोलीस स्थानकात ही बैठक झाली. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम, मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर आदींसह इतर पोलीस अधिकारीही उपस्थित होते. परिवहन कर्मचाऱ्यांनी संपावर जाऊ नये, यासाठी सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे.
जर मंगळवार दि. 5 ऑगस्ट रोजी संप झालाच तर त्याचा सामना कसा करायचा, याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत परिवहन मंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. पर्यायी व्यवस्था करण्याबरोबरच टेम्पोमालक व चालक, ऑटोरिक्षा चालकांनी अशा काळात कशा पद्धतीने सहकार्य करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बस बंद झाल्यानंतर साहजीकच पर्यायी व्यवस्थेकडे प्रवाशांचा ओघ वाढतो. खासगी टेम्पो, ऑटोरिक्षांचा वापर केला जातो. परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांची लूट करू नये, अशी सूचना पोलीस उपायुक्तांनी केली. उलट प्रवाशांना मदत करण्यासाठी ही एक संधी आहे. प्रवाशांची लूट करण्याऐवजी त्यांना मदत करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.









